आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एएमटीला पुन्हा ग्रहण; छेडछाडीचे प्रकार वाढण्याची विद्यार्थिनींना भीती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका स्थायी समितीने मागण्या धुडकावल्याने शहर बससेवा (एएमटी) बंद करण्याच्या हालचाली अभिकर्ता संस्था ‘प्रसन्ना पर्पल’ने सुरू केल्या आहेत. त्यामुळे नगरकरांच्या शहर बससेवेला पुन्हा एकदा ग्रहण लागले आहे. सेवा बंद झाली, तर शहरातील अँपे रिक्षाचालकांच्या मनमानीला प्रवासी नागरिकांना मोठय़ा प्रमाणात तोंड द्यावे लागणार आहे. दरम्यान, काहीही झाले, तरी शहर बससेवा बंद होऊ देणार नाही, अशी भूमिका महापौर शीला शिंदे यांनी घेतली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून नगरकरांना अखंड सेवा देणार्‍या एएमटीसमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. वारंवार होणारी डिझेलची दरवाढ, खराब रस्ते व अँपेरिक्षाचालकांच्या वाढत्या मनमानीमुळे एएमटीला दर महिन्याला सुमारे दहा लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. याबाबत प्रसन्ना पर्पलने महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, परंतु प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे यापुढे सेवा सुरू ठेवणे अशक्य असून 1 जूनपासून सेवा बंद करण्यात येत आहे, असे पत्र संस्थेने प्रशासनाला दिले होते. त्यामुळे महापौर शीला शिंदे यांनी तातडीने बैठक घेऊन सेवेत येणार्‍या अडचणी लवकरात लवकर दूर करण्याचे आश्वासन संस्थेला दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बस उभ्या करण्यासाठी माळीवाडा बसस्थानकाच्या मागील जागा उपलब्ध व्हावी, तेसच अनधिकृत अँपेरिक्षांवर कारवाई करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, तर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत जागा देण्याबाबत तयारी दर्शवण्यात आली. मात्र, शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत अभिकर्ता संस्थेच्या प्रमुख मागण्या फेटाळण्यात आल्या. त्यामुळे संस्थेने सेवा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

अडचणींबाबत सविस्तर प्रस्ताव प्रशासनाला सादर करावा, असे आदेश यापूर्वी झालेल्या स्थायीच्या सभेत अभिकर्ता संस्थेला देण्यात आले होते. त्यानुसार संस्थेने सादर केलेल्या नऊ मागण्यांचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायीसमोर ठेवला. परंतु स्थायीने प्रमुख मागण्या फेटाळून केवळ वर्कशॉप व कार्यालयीन जागेच्या भाड्यापोटी चालू महिन्यापासून 60 हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे नाराज झालेल्या अभिकर्ता संस्थेने सेवा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून त्याबाबत सोमवारी (24 जून) अधिकृत पत्र प्रशासनाला देण्यात येणार आहे. असे असले, तरी काहीही झाले तरी शहर बससेवा बंद होऊ देणार नाही, अशी भूमिका महापौरांनी घेतली आहे. त्यामुळे शहर बससेवेला लागलेले ग्रहण सुटणार की सुरूच राहणार, असा प्रश्न शहरातील हजारो प्रवाशांसमोर निर्माण झाला आहे.

सेवा बंद झाली, तर शहरातील अँपेरिक्षाचालकांच्या मनमानीला मोठय़ा प्रमाणात तोंड द्यावे लागेल, अशी भीती ‘दिव्य मराठी’शी बोलताना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

‘प्रसन्ना पर्पल’च्या मनपाकडे मागण्या

10 लाखांची बँक गॅरंटी परत करावी
डिझेल खर्चातील 10 टक्के वाटा उचलावा
तोटा भरपाई निधी उभारावा
वर्कशॉप व जागेचे आतापर्यंतचे भाडे द्यावे
बालपोषण अधिभार खर्चाचा बोजा उचलावा
अंध-अपंगांच्या सवलतींवर अनुदान मिळावे
अनधिकृत रिक्षांवर कारवाई करावी

छेडछाडीचे प्रमाण वाढेल
एएमटीतून प्रवास करताना सुरक्षित वाटते, परंतु ही सेवा बंद झाली, तर अँपेरिक्षाने प्रवास करावा लागेल. रिक्षाचालक सर्व नियम पायदळी तुडवत हवे तेवढे प्रवासी रिक्षात भरतात. त्यामुळे विद्यार्थिनींची कुचंबणा होते. छेडछाडीचे प्रमाणही वाढेल, त्यामुळे एएमटी सुरू ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने आवश्यक ते प्रयत्न करावेत.’’ अमृता पारधी, विद्यार्थिनी.

मनमानी वाढेल
एएमटी बंद झाली, तर रिक्षाचालकांची मनमानी वाढेल, ते म्हणतील तेवढे पैसे द्यावे लागतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करून शाळा-महाविद्यालयांत जावे लागेल. एएमटीच्या सवलतीच्या दरातील पास योजनेचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आहे. त्यामुळे ही सेवा सुरू राहणे गरजेचे आहे.’’ अंगद डेमरे, विद्यार्थी.