आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिर पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार देशहितासाठी योग्य ते निर्णय घेत अाहे. भारताचा स्वर्ग असलेला काश्मिर आज बॉम्ब आणि बंदुकांचे आवाज आक्रोशाने धुमसत असला, तरी या राज्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी मोदी कटिबद्ध आहेत, असे प्रतिपादन भाजपचे महानगराध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी केले.

जम्मू-काश्मिर राज्य भारतात विलीनीकरण झालेला दिवस शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने काश्मिर दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. लक्ष्मी कारंजा येथील पक्ष कार्यालयासमोर काश्मिर दिनाचा फलक लावून खासदार गांधी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना भारतीय लष्कर सैनिकांप्रति सन्मान अभिमान बाळगण्याची शपथ दिली. शहर चिटणीस किशोर बोरा, श्रीकांत साठे, उपाध्यक्ष जगन्नाथ निंबाळकर, खजिनदार चेतन जग्गी, अन्वर खान, विश्वनाथ पोंदे, वसंत राठोड, पीयूष जग्गी, नितीन शेलार, गौरव गुगळे, मनेष साठे, सतीश शिंदे, बंटी ढापसे, अज्जू शेख, अमृत बोरा, रौनक मुथा, कृणाला मांडोत, शशिकांत पालवे, ज्ञानेश्वर जंगम, अभय जामगावकर, राम वडागळे, मिलिंद भालसिंग आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

खासदार गांधी म्हणाले, २६ ऑक्टोबर १९४७ रोजी राजा हरिसिंग यांनी जम्मू आणि काश्मिर राज्य भारतीय गणराज्यात विलीन केले. मात्र, पाकिस्तान आणि चीनच्या दहशतवादी कारवायांमुळे काश्मिर अजूनही धुमसतो आहे. पाकिस्तान समर्थक दहशदवाद्यांनी अनेकदा भारतावर काश्मिरमध्ये हल्ले केले. उरी येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैनिकांनी सर्जिकल ऑपरेशन करून नुकताच बदला घेतला. लष्कराने आपली ताकद दाखवून दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार देशहितासाठी योग्य ते निर्णय घेत आहे. जम्मू काश्मिरला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी मोदी कटिबद्ध आहेत. काश्मिरला पूर्वपदावर आणण्यासाठी तेथे मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. रेल्वेचे जाळे संपूर्ण राज्यात पसरत आहे. मोबाइल सेवा विमानतळही विकसित होत आहेत. काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करण्यास मोदी प्राधान्य देत आहेत.

आज संपूर्ण भारतात भाजप काश्मिर दिन साजरा करून संपूर्ण देश काश्मिरवासीयांच्या मागे ठाम उभा आहे हा संदेश देत आहे. जागृत नागरिक म्हणून या देशहिताच्या लढाईत सर्व भाजप कार्यकर्ते सहभागी आहेत. देशाच्या या सन्मानाच्या लढाईत आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी एक देशप्रेमी, नागरिक म्हणून आपण सर्व शपथ घेऊ, असे खासदार गांधी म्हणाले.
दरम्यान, नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी काश्मिर दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगर येथील स्नेहालय संस्थेत मागील दोन वर्षांपासून काश्मिरमधील मुले शिक्षणासाठी येत आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी संस्थेचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन देशाच्या मूळ प्रवाहात सहभागी व्हावे, त्यांच्या माध्यमातून काश्मिरमधील अन्य समाजालाही विकासाच्या मार्गावर आणता यावे, यासाठीही व्यापक प्रयत्न सुरू आहेत. त्याला बऱ्याच प्रमाणात यशही मिळू लागले आहे.

शहीद जवानाचा फोटो आपल्या घरात लावा...
नव्यापिढीवर नवयुवकांवर देशभक्तीचे संस्कार व्हावेत, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरात एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाचा अथवा शहीद जवानाचा फोटो लावावा. देशवासीयांत एकजूट निर्माण होण्यासाठी तन-मन-धनाने भाजपचे सर्व कार्यकर्ते योगदान देतील. जी व्यक्ती अथवा संस्था देशविरोधी घटनेचे अथवा हिंसक, नक्षलवादी, आतंकवादी विचारधारेचे समर्थन करतील, तसेच देशविरोधी घटनेत सामील होतील अशा व्यक्तींची संस्थांची माहिती त्वरित सुरक्षा यंत्रणेला देऊ, अशा स्वरूपाची शपथ यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतली.
बातम्या आणखी आहेत...