आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार कर्डिले यांची जिल्हाबंदी कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शेवगाव येथील युवक अशोक लांडे याच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेले राहुरीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले यांना जामिनासाठी घालण्यात आलेली जिल्ह्यात प्रवेशबंदीची अट न्यायालयाने कायम ठेवली. तथापि, कर्डिले यांनी अटींचा भंग केल्यामुळे संपूर्ण जामीनच रद्द करावा, ही फिर्यादी शंकर राऊत यांनी केलेली मागणीही न्यायालयाने नामंजूर केली. जिल्हा न्यायाधीश आशुतोष करमरकर यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.
आमदार कर्डिले यांना मार्चमध्ये जामीन मंजूर झाला. नगर जिल्ह्यात प्रवेश करू नये, जेथे राहात असतील तेथील पोलिस ठाण्यात माहिती द्यावी, अशा अटी न्यायालयाने घातल्या होत्या. या अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी कर्डिले यांच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यांच्या वतीने अ‍ॅड. सतीश उदास, अ‍ॅड. महेश तवले व अ‍ॅड. सतीशचंद्र सुद्रिक यांनी बाजू मांडली. लोकप्रतिनिधी असल्याने कर्डिले यांना मतदारसंघातील विविध कामे करायची आहेत, मुलीचे लग्न व मुलाचे शिक्षण यासारखी घरगुती कामे करायची आहेत. बँकेचे, तसेच शिक्षण संस्थेचे कामकाज पहायचे आहे. त्यामुळे जिल्हाबंदीची अट रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सतीश पाटील यांनी बाजू मांडली. आमदार कर्डिले यांच्यावाचून कोणतीही सरकारी कामे अडून राहिलेली नाहीत. प्रशासकीय अधिकारी मतदारसंघातील कामे करीत आहेत.
कर्डिले जिल्ह्यात आले, तर खटल्यातील साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाबंदीची अट रद्द करू नये, अशी विनंती त्यांनी केली. न्यायालयाने कर्डिले यांचा अर्ज नामंजूर करीत जिल्ह्यात प्रवेशबंदीची अट कायम ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, मूळ फिर्यादी असलेल्या राऊत यांनी एक अर्ज केला होता. न्यायालयाने जामीन देताना घातलेल्या अटी कर्डिले यांनी पाळलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा जामीनच रद्द करावा, अशी मागणी त्यांनी या अर्जात केली होती. न्यायालयाने राऊत यांची ही मागणी नामंजूर केली.