आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेद महाविद्यालयात अनागोंदी व गुंडगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राज्यातील पहिले खासगी आयुर्वेद महाविद्यालय असा लौकिक असलेले गंगाधर शास्त्री गुणे महाविद्यालयात सध्या गैरव्यवहार, अनागोंदी व गुंडगिरीचे साम्राज्य आहे. हे महाविद्यालय कसेही करून बंद पाडण्याचा व संस्थेची शहरातील मोक्याच्या जागेवर असलेली 13 एकर जागा बळकावण्याचा संस्थेच्या अध्यक्षांचा डाव असल्याचा गंभीर आरोप महाविद्यालयात 30 वर्षे प्राध्यापक असलेले डॉ. श्रीधर दरेकर यांनी गुरुवारी केला. संस्थेच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय सुरू झाल्याची माहिती देऊन हे महाविद्यालय वाचवण्यासाठी कृती समिती स्थापन करण्याचा तसेच, सहा मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

डॉ. दरेकर म्हणाले, 97 वर्षे जुने असलेले व सन 1917 मध्ये वैद्य पं. गं. शा. गुणे यांनी पत्नीच्या अंगावरील दागिने विकून स्थापन केलेले हे महाविद्यालय कायमस्वरूपी बंद पडण्याची भीती प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. संस्थाचालक व दोन वर्षांपासून प्रभारी असलेल्या प्राचार्य यांच्या मनमानी, बेकायदेशीर व दडपशाहीमुळे कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान
सन 2010 मध्ये मुलांना व पालकांना फसवून अंधारात ठेवून बेकायदेशीरपणे प्रवेश देण्यात आले. दरम्यानच्या काळात सी. सी. आय. एम. ने दाखवलेल्या त्रुटी दूर करण्याचे कोणतेही प्रयत्न व्यवस्थापनाने केले नाहीत. त्यामुळे उच्च व सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही विद्यार्थ्यांना यश आले नाही. त्यामुळे 50 विद्यार्थ्यांची दोन वष्रे वाया गेली. हे विद्यार्थी व त्यांचे पालकांचे आर्थिक, मानसिक, शारीरिक व कौटुंबिक असे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी तक्रारी दाखल केल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला 25 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. हे विद्यार्थी व त्यांचे पालक दिलेली अनामत रक्कम, फी व नुकसान भरपाई मागण्यासाठी हेलपाटे मारतात. मात्र, त्यांना दमदाटी केली जाते. तुम्हाला काय करायचे ते करा, अशी दादागिरीची भाषा वापरली जाते.

दोन वर्षे नवीन प्रवेश नाहीत
अशी परिस्थिती असतानाही महाविद्यालयाच्या व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून सन 2012-13 या वर्षी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले गेले नाहीत. त्यामुळे कोणत्याही नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिले गेले नाहीत. त्यामुळे संस्थेचे सुमारे पाच ते सहा कोटींचे नुकसान झाल्याचा आरोपही डॉ. दरेकर यांनी केला.

दोन-तीन तासांत तपासणी
यावर्षी 7 व 8 फेब्रुवारी रोजी सीसीआयएमची कमिटी निरीक्षणासाठी आली होती. वैद्य निरंजन त्यागी व श्यामकुंवर हे कमिटीचे सदस्य होते. मागील वेळीही त्यागी हेच या समितीचे अध्यक्ष होते. मागील वेळी त्यांनी अत्यंत बारीकसारीक गोष्टींचे निरीक्षण केले होते. मात्र, यावेळी अल्पवेळेत म्हणजे अवघ्या दोन-तीन तासांत निरीक्षण करून समिती रवाना झाली. या घाईघाईने केलेल्या निरीक्षणाचे कोडे अजून कुणालाही उलगडले नाही. मात्र, एकूण परिस्थिती पाहता यावर्षीही नवीन प्रवेश होण्याची सूतराम शक्यता नाही. सलग तीन वर्षे महाविद्यालय बंद राहिले, तर पुन्हा नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे सोपस्कार करावे लागतील, अशी माहिती त्यांनी दिली.

ज्येष्ठता व नियम डावलून नेमणुका
तीस-तीस वर्षे सेवा झालेल्या अनुभवी प्राध्यापकांना डावलून 6 ऑगस्ट 2011 रोजी वैद्य संगीता निंबाळकर यांना प्रभारी प्राचार्य म्हणून नेमण्यात आले. त्यांना महाविद्यालयातील अध्यापनाचा फक्त पाच वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठ अध्यापकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर प्राचार्यांनी मनमानी व बेकायदेशीर कारभार धडाक्याने सुरू केला. स्वत:च्या पतीला एकदम सात इन्क्रिमेंट देण्याचा पराक्रम त्यांनी केला. हे लक्षात आल्यानंतर ती इन्क्रिमेंट रद्द करण्यात येऊन सरकारने त्यांच्या पगारातून लक्षावधी रुपयांची वसुली केली. एक रुपयाही खर्च करण्याचे कायदेशीर अधिकार नसताना कोट्यवधी रुपयांचे त्यांनी बिनदिक्कत व्यवहार केल्याचा आरोप डॉ. दरेकर यांनी केला. शासनाच्या विद्यापीठाच्या व सीसीआयएमच्या नियमाप्रमाणे या प्राचार्यांची नियुक्ती केली नसल्याने कोणाचाही मान्यता मिळालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

या सर्व गैरप्रकारांमुळे महाविद्यालय कायमस्वरूपी बंद पडण्याची भीती आहे. त्यामुळे लवकरच आजी-माजी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, तसेच सेवाभावी संस्थांची कृती समिती स्थापन करून पुढील आंदोलन करण्यात येईल, असे डॉ. दरेकर यांनी सांगितले.

रुग्णांची संख्या प्रचंड रोडावली
गेल्या काही वर्षांपासून हॉस्पिटलचे रूपांतर धर्मशाळा किंवा अनाथालयात झाले आहे. ज्यांना घरी सांभाळले जात नाहीत, असे लोक येथे राहतात. रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली आहे. वर्षाला किमान 36 हजार रुग्ण येणे आवश्यक आहे. मात्र, दिवसभरात जेमतेम 20 ते 25 रुग्ण येतात. त्यांना त्रिफळासारखी औषधेही मिळत नाहीत. ऑपरेशन थिएटर कायम बंद असते. वर्षभरात जेमतेम 10-12 शस्त्रक्रिया होतात. मात्र, खोटी आकडेवारी सादर केली जाते. येथील रुग्णसंख्येप्रमाणेच कर्मचार्‍यांची संख्याही बनावट दाखवली जात असल्याची माहिती डॉ. दरेकर यांनी दिली. महाविद्यालयाची तपासणी करण्यासाठी समिती येणार असल्यास तात्पुरत्या स्वरूपात आरएमओ, अधीक्षक, उपअधीक्षक अशा नेमणुका केल्या जातात. समितीची पाठ फिरली की, पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती होते.

वसतिगृहात ‘राष्ट्रवादी’चे कार्यालय
मुलांच्या वसतिगृहाचे रूपांतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विर्शांतीसाठी झाले आहे. आरएमओ निवासस्थानाची मोडतोड करून एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय व दुसर्‍या बाजूला स्वत:च्या कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी कँटीनमध्ये रूपांतर झाले, अशी माहिती डॉ. दरेकर यांनी दिली. नावाजलेल्या संस्थेत एखाद्या पक्षाचे कार्यालय सुरू करणे ही गंभीर बाब आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मुक्त ये-जा करण्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्रासाला तोंड द्यावे लागते. याबाबत अनेकवेळा आवाज उठवण्याचे प्रयत्न झाले. मात्र, ते दडपण्यात आले. संबंधित कार्यालय आठ दिवसांत अन्यत्र हलवावे, अशी मागणी डॉ. दरेकर यांनी केली.