आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर बनलेय बेकायदा गतिरोधकांचे शहर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहराकडे येणाऱ्या सर्व महामार्गांवर सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे बेकायदा गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारले आहेत. ते कोणत्याही निकषांचे पूर्ण उल्लंघन करणारे आहेत. विशेष म्हणजे यातील कोणतेही गतिरोधक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उभारण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती समजली. त्यामुळे नगर आता बेकायदा गतिरोधकांचे शहर बनत आहे.

शहरातील कोणताही रस्ता गतिरोधकांपासून सुटलेला नाही. महामार्गंवर गतिरोधक उभारण्यास मनाई अाहे, तरीही त्यावरही गतिरोधक उभारण्यात आले आहेत. त्यापैकी जिल्हा पोलिस अधीक्षक चौकातील गतिरोधकांची साखळी सोमवारी काढून टाकण्यात आली. शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरील सर्व गतिरोधक बेकायदा आहेत. ते काढून टाकावेत; अन्यथा त्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा सन्माननीय नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद मोहोळे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सोमनाथ कराळे यांनी दिला आहे.

गतिरोधक नसल्यापेक्षा असल्याने जास्त अपघात होतात, हा इंडियन रोड काँग्रेसने मान्य केले आहे. त्याचे प्रत्यंतर नगरमध्ये येत आहे. कारण गतिरोधक उभारताना कोणतेही निकष पाळलेले नसल्याने उलट अपघातांत वाढ झाली आहे. गतिरोधक उभारताना अनेक ठिकाणी त्यांचा सूचना फलक नसल्याने वाहने आदळण्याचे प्रकार घडत आहेत. शनिवारी तारकपूर चौकात एक दुचाकी चालक तरुणाची दुचाकी अचानक समोर आलेल्या गतिरोधकांवर आदळून तो खाली पडला. नंतर तो दुचाकीसह सुमारे पन्नास फूट फरफटत गेला.

रुग्णवाहिका आदळून रुग्णांना होतो त्रास
मुळातगतिरोधकांची अशी साखळीच उभारता येत नाही. सावेडी परिसरात मोठ्या प्रमाणावर रुग्णालये आहेत. त्यामुळे रुग्ण घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांची मोठी वर्दळ असते. गतिरोधक लक्षात आल्याने रुग्णवाहिका त्यावर आदळून रुग्णांनाही मोठा त्रास सहन करण्याच्या घटना घडत आहेत. एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यावर संबंधित सरकारी विभाग शहाणे होणार आहे का, असा संतप्त सवाल एका रुग्णवाहिका चालकाने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनाही धाब्यावर
महामार्गांवरगतिरोधक टाकण्यास सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा मनाई केली आहे. त्याचप्रमाणे राज्यपालांनीही गतिरोधकाविरोधात तीन परिपत्रके जारी केली आहेत. ती धुडकावून आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी मनमानी पद्धतीने बेकायदा गतिरोधक उभारले जात आहेत. जिल्हा प्रशासन पोलिस उदासीन असल्याने शहर परिसरात एकही रस्ता गतिरोधकांविना राहिलेला नाही.

अतिक्रमणांकडे दुर्लक्ष
बहुसंख्यगतिरोधक चौकांच्या अलीकडे बसवण्यात आले आहेत. पण या चौकांत असलेले अतिक्रमण काढण्यात संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केले आहे. खासगीकरणातून रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडून चौकांचे विस्तारीकरण करणे, तेथील रस्ते निविदेप्रमाणे रुंद करणे याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्याऐवजी बेकायदा गतिरोधक उभारण्याचा सोपा मार्ग निवडण्यात आला आहे. त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे.

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
शहरातअत्यंत बेशिस्त वाहतूक आहे. वाहतूक पोलिसांकडून कारवाई फक्त ज्यांच्याकडे वाहन चालण्याचा परवाना नाही, त्यांच्यावरच होते. सिग्नल तोडणारे, ट्रिपल सीट जाणारे, दुचाकीला प्रेशर हॉर्न बसवणाऱ्यांवर कारवाई होत नाही. पोलिसांसमोर सिग्नल तोडून गेले, तरी त्यांच्याकडे कानाडोळा केला जातो. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते.

राज्यमार्गावर बेकायदा गतिरोधक
रस्त्यावरगतिरोधक उभारण्याआधी तेथे किती अपघात झाले, याचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांंच्या अध्यक्षतेखालील जिल्हा पोलिस अधीक्षक, महापालिकेचे आयुक्त सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंत्यांच्या समितीमार्फत गतिरोधक उभारण्याचा प्रस्ताव तयार करून तो नाशिकला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठवावा लागतो. त्यांनी परवानगी दिली, तरच राज्य महामार्गावर गतिरोधक उभारता येतात. नगरमध्ये अलीकडील काळात जे बेकायदा गतिरोधक उभारले जात आहेत. त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांची परवानगीच मिळालेली नाही, अशी माहिती समजली.
सध्या शहरात १३ ठिकाणी अशा बेकायदा गतिरोधकांच्या साखळ्यांची उभारण्यात आली. गतिरोधकांबाबत ज्यांची जबाबदारी आहे, त्या जिल्हा प्रशासनाला याची जराही माहिती नाही. गतिरोधकांसाठी असलेली समितीचे अस्तित्व केवळ कागदोपत्री उरले आहे. जिल्हा प्रशासनाची परवानगी असल्याचे सांगून रातोरात बेकायदा गतिरोधक उभारले जात आहेत. त्यामुळे वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे.

गरज नसलेल्या ठिकाणी गतिरोधक
नव्यानेउभारण्यात आलेले बहुतेक गतिरोधक अजिबात गरज नसलेल्या ठिकाणी आहेत. नगर-मनमाड महामार्गावर सावेडी परिसरात उभारण्यात आलेले गतिरोधक हे त्याचे उदाहरण आहे. कारण या रस्त्यावर वाहतुकीची कायम मोठी वर्दळ असल्याने वाहनांचा वेग आधीच कमी असतो. अशा ठिकाणी गतिरोधकांची साखळी उभारून संबंधितांनी काय साधले, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे.

गतिरोधकांची साखळीच बेकायदा
डांंबर,खडी वापरून गतिरोधकांची जी साखळी उभारली जाते, ती बेकायदेशीर आहे. कारण साखळी उभारायची असेल, तर ती रबरी पट्ट्यांची असते. त्यांना ‘रंबल स्ट्राईपस’ म्हणतात. अशा फक्त तीन रबरी पट्ट्यांचीच साखळी उभारता येते. त्यातील एका पट्टीची रुंदी एक इंच उंची अर्धा इंच असते. डांबर खडी वापरून फक्त एक गतिरोधक, तोही चार इंच उंचीचा दोन्ही बाजूस १७ फूट उताराचा उभारता येतो. खडी डांबराच्या गतिरोधकांची मनमानी पद्धतीने पाच, सहा किंवा सात गतिरोधकांची साखळी पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

जिल्हाधिकारी अनभिज्ञ
नव्यानेनगरमध्ये १३ ठिकाणी बेकायदा गतिरोधक उभारण्यात आले. त्यातील काही शहरातील रस्त्यांवर, तर काही राज्य महामार्गांवर आहेत. जिल्हास्तरीय गतिरोधक समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना बेकायदा गतिरोधकांच्या उभारणीबद्दल विचारले असता, त्यांनी आपण एकही गतिरोधक उभारण्याचा आदेश दिला नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत त्यांना कोणीही माहिती दिली नसल्याचेही उघड झाले.

तीव्र आंदोलन उभारणार
महामार्गांवर कोणत्याही परिस्थितीत गतिरोधक उभारणे चुकीचे आहे. या गतिरोधकांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. असे बेकायदा गतिरोधक त्वरित काढून टाकावेत, तसेच ते उभारणाऱ्या ठेकेदारांचे पैसे देऊ नयेत. तसे केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.'' सोमनाथकरा‌ळे, अध्यक्ष,स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड.

नगर शहराकडे येणाऱ्या सर्व महामार्गांवर अलीकडील काळात ठेकेदारांनी सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारले आहेत. त्यावर काळे-पांढरे चौकोन रंगवलेले नाहीत, तसेच सूचना फलकही लावण्यात आलेले नाहीत. छाया: कल्पक हतवळणे.

बंधनकारक निकष
>गतिरोधकाची मध्यभागी (सर्वाधिक) उंची फक्त चार इंच.
>रस्त्याच्या लांबीच्या दिशेने गतिरोधकाची रुंदी १७ फूट असणे आवश्यक.
>गतिरोधकावर बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे काळे-पांढरे चौकोन रंगवणे आवश्यक.
>रस्त्याच्या पूर्ण रुंदीत म्हणजे साईडपट्ट्यांसह गतिरोधक बांधणे आवश्यक.
>गतिरोधकांच्या आधी शंभर मीटरवर त्याचा फलक असणे आवश्यक.
>गतिरोधकाच्या आवश्यकतेचे स्पष्टीकरण देणे आवश्यक.
>गतिरोधक मानकाप्रमाणे आहेत की नाहीत याची तपासणी त्यानुसार जुने तोडून नवे मानकांप्रमाणे बांधणे.

संबंधितांविरोधात फौजदारीची मागणी
याबेकायदा गतिरोधकांबद्दल या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याची गरज आहे. बेकायदा गतिरोधकांमुळे अपघात किंवा अन्य त्रास झालेल्यांनी या विरोधात पोलिसांत तक्रार द्यावी किंवा ९४२२२२००५९ ९९२३७६००५९ या क्रमांकांवर संपर्क करावा. प्रमोद मोहोळे, अध्यक्ष,सन्माननीय नागरिक