आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यात आढळले 80 प्रजातींचे 23 हजार पक्षी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या वतीने जानेवारीत करण्यात आलेल्या पक्षी गणनेत जिल्ह्यात 80 प्रजातींचे 22 हजार 914 पक्षी आढळून आले. या गणनेत जिल्ह्यातील 18 निरीक्षकांसह 180 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कर्जत तालुक्यात सर्वाधिक 10 हजार पक्ष्यांची नोंद झाली.

पक्षीमित्र संघटनेमार्फत 11 ते 26 जानेवारी या कालावधीत राज्यभर महापक्षी गणना करण्यात आली. जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, संगमनेर, कर्जत, अकोले, नेवासे, नगर, श्रीगोंदे, शेवगाव व पाथर्डी या दहा तालुक्यांमध्ये 18 निरीक्षकांनी पक्षीगणना केली. 180 शालेय विद्यार्थ्यांनीही गणनेत सहभाग घेतला. जिल्ह्यात 67 ठिकाणी ही गणना करण्यात आली. यात 80 प्रजातींच्या 22 हजार 914 पक्ष्यांची गणना झाली. यावेळी कापशी, कवड्या धीवर, शामा, ठिपकेवाला कवडा, पाणकावळा, ग्रे हेरॉन, काळा शराटी, करकोटा, नाचण, धोबी यासह विविध प्रजातींचे पक्षी आढळले.

पाथर्डी तालुक्यात पक्षीगणनेला मोठा प्रतिसाद मिळाला. या तालुक्यात 46 ठिकाणी पक्षीगणना झाली. तालुक्यातील आठ निरीक्षकांसह 102 विद्यार्थ्यांनी ही गणना केली. याच वृद्धेश्वर जंगल व घाटशिरस तलावात पक्ष्यांच्या विविध प्रजाती आढळून आल्या.

भिंगार येथील जयराम सातपुते यांनी पक्षीगणनेचे काम केले. ऋषिकेश गावडे, महेश फलके, विकास सातपुते, चंद्रकांत उदागे, अनमोल होन, विजयकुमार राऊत, शिवकुमार वाघुंबरे, विजय बोरुडे, स्नेहा ढाकणे, देवेंद्र अंबेटकर, सतीश परदेशी आदी नवोदित पक्षीनिरीक्षकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.