आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर राजभाषा समितीचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - हिंदी भाषेच्या उत्कृष्ट प्रसारकार्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भारत संचार निगमचे येथील महाप्रबंधक अजातशत्रू सोमाणी व राजभाषा अधिकारी विजय नगरकर यांना सन्मानित करण्यात आले.

दिल्लीतील विज्ञान भवनात हा कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राज्यमंत्री किरण रिज्जू, राजभाषा विभागाच्या सचिव नीता चौधरी, संयुक्त सचिव पूनम जुनेजा आदी उपस्थित होते.

भारत सरकारच्या राजभाषा विभागातर्फे उत्कृष्ट राजभाषा हिंदी कामकाजासाठी देशातील विभिन्न मंत्रालये, विभाग, बँक, उपक्रम यांना दरवर्षी इंदिरा गांधी राजभाषा पुरस्कार दिले जातात. नगर शहर राजभाषा कार्यान्वयन समितीला यंदा राष्ट्रीय स्तरावरील तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भारत संचारचे महाप्रबंधक तथा नगर राजभाषा कार्यान्वयन समितीचे अध्यक्ष सोमाणी यांना इंदिरा गांधी राजभाषा पुरस्कार म्हणून स्मृतिचिन्ह, तर राजभाषा अधिकारी व नगर राजभाषा कार्यान्वयन समितीचे सदस्य सचिव नगरकर यांना विशेष राजभाषा प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल सोमाणी व नगरकर यांचे विविध संस्था, संघटना, तसेच राज्य व केंद्रीय अधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

राजभाषा समितीच्या कार्याची दखल
१९९८ पासून नगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्या कार्याचे संचालन भारत संचार निगमतर्फे केले जात आहे. समितीने आतापर्यंत नगर शहरातील अनेक केंद्र सरकारी विभाग, बँका, उपक्रमासाठी दैनंदिन कामकाजात हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी डिजिटल शब्दकोष, प्रशिक्षण, कार्यशाळा, वार्षिक पुरस्कार, संगणकावर हिंदी युनिकोडचा उपयोग आदी अनेक कार्यक्रम आयोजित केले. या कामाची दखल राजभाषा विभागाद्वारे घेण्यात आली.