आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरचा बाह्यवळण रस्ता ७० टक्के ‘गायब’, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वर्षभरातच रस्ता पूर्ण नामशेष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कोट्यवधींचा खर्च करूनही अत्यंत निकृष्ट दर्जामुळे नगर शहराभोवतीचा बाह्यवळण रस्ता नामशेष होऊ लागला आहे. अवघ्या वर्षभरातच या रस्त्याचा ७० टक्के भाग सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘इतिहासजमा’ केला आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे अन् प्रचंड धुळीचे साम्राज्य असल्याने एमआयडीसी ते कल्याण रस्त्यादरम्यानच्या चार किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी एका तासापेक्षा अधिक वेळ लागतो. त्यामुळे अवजड वाहने पुन्हा शहरातून जाऊ लागली आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरचा वाहतुकीचा ताण वाढण्याबरोबरच अपघातांची भीती वाढली आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्याची चर्चा सुरू झाली आहे.

बाह्यवळण रस्ता कोणत्या तंत्राने तयार झाला, यावर संशोधन करण्याची वेळ आली आहे. या रस्त्याचा विषय उद्योगमित्र संघटनेच्या सभेतही गाजला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी ‘आम्ही एकीकडे तासनतास बैठका घेऊन ५० ते ७५ कोटींचा निधी आणला. निकृष्ट दर्जाचा रस्ता करून तो तुम्ही पाण्यात घातला’, असे उदगार काढले होते. अर्थात सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी हे उदगार अजिबात मनावर घेतले नाहीत. त्यावेळी खड्ड्यांची डागडुजी करून रस्ता वाचला असता, पण आता उरला-सुरला रस्ताही नष्ट झाला आहे, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. रस्ता बनवताना त्यावरील वाहतुकीचा अंदाज कसा येत नाही? ज्यांनी रस्त्याचे काम केले, त्यांच्यावर कारवाई का करत नाही? रस्त्याच्या कामाचा दर्जा का राखला जात नाही, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले होते.

‘केवळ ठेकेदार हिताय’ हे ब्रीद असलेल्या सार्वजनिक बांधकामने वर्षभरापूर्वी तयार केलेल्या वळण रस्त्याची पूर्ण वाट का लागली, याबद्दल संबंधितांपैकी कोणालाही ‘ना खंंत ना खेद,’ अशी स्थिती आहे. सार्वजनिक बांधकामच्या नाकर्तेपणामुळे अवजड वाहने शहरातून जाऊ लागल्याने नगरकरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून जाताना अवजड वाहनांची चाके इतकी खोल जातात, की वाहनाचा समतोल ढळतो. त्यामुळे दररोज किमान दोन-तीन वाहन उलटण्याचा प्रकार येथे होत आहे. ‘दिव्य मराठी’ सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत आहे. छायाचित्रकार रस्त्याची छायाचित्रे घेत असताना प्रत्येक वाहनचालक रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आशेने ‘आप कुछ तो भी करो, अशी विनंती करत होता.

या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. विशेषत: दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे मोठे कंटेनर या रस्त्यावरून जातात. याची जाणीव असतानाही इतका कमकुवत रस्ता कसा तयार झाला, याची उत्तरे कोणीही देत नाही.
बाह्यवळण रस्त्यामुळे शहरातून जाणारी अवजड वाहतूक बाहेरून वळल्याने अपघातांच्या प्रमाणात बऱ्यापैकी घट झाली होती. आता मात्र अवजड वाहने परत शहरात येऊ लागल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नगरकरांचा जीव धोक्यात आणणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक संघटनेने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

पूर्ण रस्ता काँक्रिटचा करावा
हा रस्ता काळ्या मातीवर बनवलेला आहे. त्याचा पाया व्यवस्थित झाल्याने तो खचला आहे. नगर शहर मध्यवर्ती असल्याने हा वळण रस्ता चांगल्या दर्जाचा असणे गरजेचे आहे. पूर्ण रस्ता चौपदरी काँक्रिटचा करण्याची गरज सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. तसे केल्यास या रस्त्यावर केलेला करण्यात येणारा सर्व खर्च वाया जाणार आहे.

‘राष्ट्रीय महामार्ग’कडे देणार?
या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती समजली. कारण हा रस्ता खराब होण्यामागे अनेक तांत्रिक कारणे असल्याचा साक्षात्कार सार्वजनिक बांधकाम विभागाला झाला आहे. मात्र, रस्ता तयार करणाऱ्या त्यावेळच्या कार्यकारी अभियंत्यांनी याचा अभ्यास करता कसा काय रस्ता तयार केला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कांदा मार्केट ते पुणे रस्ता बरा
सध्यानेप्ती येथील कांदा मार्केट ते पुणे रस्त्यादरम्यानचा भाग बऱ्या स्थितीत आहे. कांदा मार्केटपासून थेट एमआयडीसीमार्गे विळदपर्यंत रस्ता कोठे आहे, हे शोधण्याची वेळ येते. मोठे खड्डे, त्यात टाकलेली माती यामुळे अवजड वाहनांचे चालक या रस्त्याने येण्यास नाखूष असतात. त्यामुळे ते नगर शहरातून जात आहेत. अवजड वाहतुकीने शहरातील रस्त्यांचीही वाट लागत आहे.

न्यायालयात दाद मागणार
हा रस्ता खराब होण्यामागे निकृष्ट दर्जाचे काम भ्रष्टाचार हेच कारण आहे. हा रस्ता तयार करताना केलेल्या चुकांमुळे अनेक लोकांना अपघातांत प्राणांना मुकावे लागले आहे. संबंधित अभियंत्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, यासाठी आम्ही लवकरच न्यायालयात दाद मागणार आहोत.'' अभिजि तखोसे, शहर जिल्हाध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस.
बातम्या आणखी आहेत...