आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जि.प. सत्ता गेल्याचे ‘त्यांना’ मोठे दु:ख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - चारा डेपोंमध्ये वशिलेबाजी झाल्याच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. चारा वाटपात पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. आरोप करणार्‍यांनी तसे ठोस पुरावे द्यावेत. आम्ही चौकशी करू, असा पलटवार पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांचा नामोल्लेख टाळून केला.

चारा डेपो देताना वशिलेबाजी झाल्याचा आरोप विखे यांनी मंगळवारी केला होता. जिल्हा परिषदेत घेतलेल्या जनता दरबारातही त्यांनी राष्ट्रवादीवर टीका करीत समन्वय ठेवा, अन्यथा वेगळा विचार करू असे सुनावले होते.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शासकीय विर्शामगृहात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाचपुते यांनी विखेंना चोख प्रत्युत्तर दिले. चारा डेपोचे व्हिडिओ चित्रीकरण केले आहे. त्यामुळे या आरोपांत तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेतील सत्ता गेल्याचे मोठे दु:ख त्यांना आहे. त्यामुळे ते असेच बोलणार असा खोचक टोमणाही पाचपुते यांनी मारला. जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष चांगले काम करीत असल्याचे सांगत पाचपुते यांनी त्यांची पाठराखण केली.

जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीबाबत पाचपुते यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीस जि. प. अध्यक्ष विठ्ठल लंघे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, सदस्य सुजित झावरे, पोलिस अधीक्षक आर. डी. शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव, जिल्हा पुनर्वसन अधिकारी गोरक्ष गाडीलकर, रोहयो उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

या बैठकीपूर्वी काही सर्वपक्षीय कार्यकर्ते व वाळकी गणातील शेतकरी पालकमंत्र्यांना भेटले. प्रशासनाने अचानक चारा डेपो बंद केल्याची तक्रार त्यांनी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. ‘‘माझ्या तालुक्यातील चारा डेपो मला न विचारता बंद करता, मग वांबोरीचा डेपो कसा काय सुरू आहे?’’ अशा शब्दांत त्यांनी अधिकार्‍यांना झापले. टंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी शासनाने 7 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तथापि, जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये 25 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. पुरेसा पाऊस होईपर्यंत चारा डेपो सुरू ठेवावे लागतील. चारा डेपोंना 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असे पाचपुते यांनी सांगितले.

बुर्‍हाणनगर, मिरी-तिसगाव, कान्हूरपठार या तीन योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित कराव्यात. या योजना हस्तांतरित करताना त्रुटींची तत्काळ पूर्तता करावी, असे पाचपुते यांनी सांगितले.
चार्‍यासाठी लवकरच 25 कोटी मिळणार - चार्‍यासाठी 35 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली असून त्यातील 25 कोटी दोन दिवसांत मिळतील, असे सांगण्यात आले. रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी 26 कोटींची मागणी केली असून 10 कोटी रुपये मिळाले आहेत.