आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाच्या निरोपाची जय्यत तयारी, यंदा मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - फुलांनी सजवलेल्या सिंहासनावर, तर काही ठिकाणी चांदीच्या पालखीत विराजमान झालेला बाप्पा... ढोल-ताशांचा दणदणाट... सनईचे मंगलमयी सूर... रांगोळ्यांच्या पायघड्या... वेगवेगळ्या लेझीम क्रीडा प्रकारांचे सादरीकरण... अशा पारंपरिक वातावरणात शहरातील प्रमुख मंडळांच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक गुरूवारी (१५ सप्टेंबरला) निघणार आहे. सकाळी १० पासून मानाच्या गणेश मंडळांच्या मिरवणुका निघतील. त्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. मिरवणुकीत काेणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून जिल्हा पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीवर ९० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे.

शांततापूर्ण शिस्तबद्ध मिरवणूक काढणाऱ्या मंडळांना विशेष बक्षिसे देऊन गौरवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने यंदाही घेतला आहे. दरवर्षी डीजेला फाटा देण्याचे आवाहन केले जाते. मात्र, तरुणाईच्या हट्टापायी काही मंडळे डीजे लावतातच. गेल्या काही वर्षांपासून मात्र ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीबाबत उच्च न्यायालयाने कठोर आदेश दिल्यामुळे पोलिस प्रशासनही कडक झाले आहे. म्हणूनच यंदा गणेशाच्या स्वागताला डीजे वाजले नाहीत.
भिंगारमध्येही सर्व मंडळांनी यावेळी डीजेमुक्त मिरवणूक काढली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मिरवणुकीत १७ मंडळे सहभागी झाली. सर्व मंडळांनी पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या तालावर बाप्पाला निरोप दिला.

शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक रामचंद्र खुंट, आडते बाजार, दाळ मंडई, तेलीखुंट, कापडबाजार, अर्बन बँक चौक, नवी पेठ, खामकर चौक, चितळे रस्ता, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट यामार्गे जाऊन कल्याण रस्त्यावरील बाळाजी बुवा बारवेत गणेशमूर्तींचे विसर्जन होईल. मिरवणुकीतील जमाव विसर्जन करून पुन्हा जोडरस्त्याने येऊन मुख्य मिरवणुकीत सामील होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या रस्त्याला मिळणारे रस्ते, उपरस्ते, गल्लीबोळा, जोडरस्ते यांचा दोन्ही बाजूला १०० मीटर अंतरापर्यंत वापर करण्यास मनाई करण्यासाठी सीआरपीसी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे.
मिरवणुकीची डावी बाजू : पाचलिंबगल्लीकडे जाणारा रस्ता, सारडा गल्लीकडे जाणारा रस्ता, मोची गल्लीकडे जाणारा रस्ता, जुना कापड बाजाराकडे जाणारा रस्ता, माणिक चौकाकडे जाणारा रस्ता, अर्बन बँक ते माणिक चौकाकडे जाणारा रस्ता, नवीपेठ ते आझाद चौकाकडे जाणारा रस्ता, सुवालाल गुंदेचा यांच्या घरापासून गांधी मैदानाकडे जाणारा रस्ता, नवीपेठेतून खजूर गल्लीकडे जाणारा रस्ता, खजूरगल्लीकडे जाणारी बोळ (चितळे रस्ता), नगर वाचनालय, खजूरगल्लीकडे जाणारा रस्ता, चितळे रस्ता पोलिस चौकी, मिरावली दर्गा, लक्ष्मी कारंजाकडे जाणारा रस्ता, चितळे रस्ता, रंगारगल्लीकडे जाणारा रस्ता, चौपाटी कारंजा, कोर्टाकडे जाणारा रस्ता नालेगावकडे जाणारा रस्ता.

मिरवणुकीची उजवी बाजू
बागडपट्टीकडेजाणारा रस्ता, हॉटेल जगदीश भुवन, कुंभार गल्लीकडे जाणारा रस्ता, मुंजाबा चौक, ठाकूर गल्ली, शिवालयाकडे जाणारा रस्ता, छाया टॉकिज, तोफखानाकडे जाणारा रस्ता, हॉटेल पिंगारा, कागदपुठ्ठा मशीद, भराडगल्लीकडे जाणारा रस्ता, नेहरू मार्केट भराड गल्लीकडे जाणारा रस्ता, चितळे रस्ता, सातभाईगल्लीकडे जाणारा रस्ता, चौपाटी कारंजा, नालेगावकडे जाणारा रस्ता. या रस्त्यांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. फौजदारी दंड संहिता प्रक्रियेअंतर्गत नगरच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

कडेकोटबंदोबस्त
पोलिसअधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक, उपअधीक्षक, १० निरीक्षक, ३७ सहायक उपनिरीक्षक, ५०० पोलिस कर्मचारी, ९० महिला पोलिस, आरसी प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स, ९० पुरुष, २५ महिला होमगार्ड. तीन छेडछाडविरोधी पथके.

सावेडीत १२ वाजता मिरवणुकीला प्रारंभ
सावेडीत लक्ष्मी आईच्या मंदिरापासून दुपारी बारा वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल. काही बाप्पांचे विसर्जन मुळा धरणात होते. दहा दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर त्याला निरोप देताना सर्वजण भावुक होतात. पुढच्या वर्षी लवकर या, असे आवाहन करत बाप्पाला निरोप दिला जाईल. शाळा-महाविद्यांलयांतील बाप्पांचेही दुपारपर्यंत विसर्जन होईल.

पोलिसांतर्फे खास गौरवचिन्हे
मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या शिस्तबद्ध मंडळांना जिल्हा पोलिस दलातर्फे तीन गौरवचिन्ह दिले जाणार आहेत. पारंपरिक वाद्य, तसेच ढोलपथकांनाही प्रत्येकी तीन गौरवचिन्ह देण्यात येणार आहेत. सर्व मंडळांनी पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

नाकाबंदी, वाहनांची कडक तपासणी
यंदा मिरवणुकीत गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी साध्या वेशातील पथके नेमली आहेत. कॅमेरे आणि दुर्बिणीतूनही "वॉच' असेल. शहराच्या सीमेवर नाकेबंदी करण्यात येणार असून वाहनांची कडक तपासणी करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जाईल. संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू आढळल्यास नागरिकांनी थेट पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

हिप्पो क्रेनची मदत; शहरात टेहळणी
आणीबाणीच्या वेळी उपयोगी पडाव्यात, म्हणून हिप्पो क्रेन, छोट्या पोलिस क्रेन, खासगी आणि महापालिकेच्या क्रेन ठेवण्यात येणार आहेत. टेहळणी करण्यासाठी मुख्य विसर्जन मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी मनोरे उभारण्यात आले आहेत. मुख्य मिरवणुकीवर खास लक्ष ठेवण्यासाठी ठरावीक इमारतींची छते प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत.
बातम्या आणखी आहेत...