आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर शहराला आता परिवर्तनाची गरज...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- श्रीरामपूर व संगमनेरसारखी तालुक्याची ठिकाणे विकासाच्या बाबतीत नगर शहराच्या कितीतरी पुढे गेली. इतर शहरांच्या तुलनेतही नगर सतत मागे पडत चालले आहे. त्यामुळे या शहराला आता खर्‍या अर्थाने चांगल्या नेतृत्त्वाची गरज आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी केले.

शहर जिल्हा काँग्रेसच्या लालटाकी येथील नव्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी थोरात बोलत होते. या वेळी आमदार शरद रणपिसे, डॉ. सुधीर तांबे, नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा, माजी खासदार दादापाटील शेळके, अरुण मुगदिया, दीप चव्हाण, अनंत देसाई, बाळासाहेब भुजबळ आदी उपस्थित होते. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे मात्र आले नाहीत.

थोरात म्हणाले, मनपा निवडणुकीसाठी पक्ष चांगले उमेदवार देणार आहे. शहराची दुरवस्था सर्वांनाच माहिती आहे. ‘खड्डय़ांचे शहर’ म्हणून नगरची ओळख निर्माण झाली आहे. रस्ते, ड्रेनेज अशा सुविधांपासून शहर अजून वंचित आहे. शिवसेनेकडे गेल्या 25 वर्षांपासून आमदारकी आहे, परंतु त्यांनी शहराची काळजी घेतली नाही. ‘चाँदबीबी आली तर..’ असे गमतीने म्हटले जाते, परंतु ते खरे आहे. शहराची अवस्था अगदी तशीच झाली आहे. एकीकडे र्शीरामपूर व संगमनेरसारखी गावे विकासाच्या बाबतीत नगरपेक्षा पुढे गेली आहेत. आता परिवर्तनाची वेळ आली आहे. शहर सुंदर करण्यासाठी परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे.

संदीप कोतकर महापौर असताना त्यांनी राज्य शासनाकडून तीनशे कोटींचा निधी आणला. त्याच निधीतून सध्या शहरात विकासकामे सुरू आहेत. आताचे सत्ताधारी केवळ उद्घाटने करत आहेत. त्यांनी एकही नवीन काम केले नाही. कोणी काहीही म्हणो, केंद्रात व राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सर्व तुमच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासनही थोरात यांनी दिले.

आमदार रणपिसे म्हणाले, मनपा निवडणुकीसाठी आमची भूमिका ‘बॉसिंग’ची नव्हे, तर सहकार्याची राहणार आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी आला, तरी शहराचा विकास झालेला नाही. त्यामुळे आता मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याची वेळ आली आहे. निवडणुकीसाठी येत्या रविवारी (6 ऑक्टोबर) शासकीय विर्शामगृह येथे प्रभागनिहाय चाचपणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व इच्छुक उमेदवारांशी व त्यांच्या सर्मथकांशी चर्चा करण्यात येईल. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल. निवडणूक समिती व प्रचार समिती तयार करून काम सुरू करण्यात येणार आहे. निवडणूक सारडा यांच्या नेतृत्वाखालीच लढवण्यात येणार आहे, आम्ही फक्त सहकार्य करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन
सायंकाळी 4 वाजता होणारे उद्घाटन तीन तास उशिरा म्हणजे 7 वाजता झाले. या वेळी पक्षप्रवेशासाठी काही कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. काहींनी तर मान्यवरांचे भाषण सुरू असतानाही घोषणाबाजी सुरू ठेवली. कार्यकर्त्यांनी शांत राहावे, यासाठी आमदार रणपिसे यांना अनेकदा विनंती करावी लागली. पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.


युतीची ठेकेदारी
प्रास्ताविक करताना ब्रिजलाल सारडा म्हणाले, महापालिकेत युतीच्या नगरसेवकांनी सत्तेच्या माध्यमातून ठेकेदारी केली. त्यामुळे शहर भकास झाले. शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा धंदा आता बंद झाला पाहिजे. काँग्रेस हा गांधीजींचे विचार घेऊन चालणारा पक्ष आहे. निवडणुकीसाठी पक्षाला वातावरण आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही.