आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar City Wedding Hall And Hoteles Parking Issue

त्यांचे होते ‘मंगल’ बाकीच्यांना फक्त त्रास, बहुतांश मंगल कार्यालयांना पार्किंग नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या विविध मंगल कार्यालयांना वाहनतळाची सुविधाच उपलब्ध नाही. या मंगल कार्यालयांमध्ये काही कार्यक्रम असल्यास कार्यालयाबाहेर अस्ताव्यस्त वाहने लावली जातात. अशा पद्धतीच्या पार्किंगमुळे व नवरदेवांच्या मिरवणुकीमुळे शहरातील वाहतुकीचा श्वास मात्र कोंडला आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेने प्रोफेसर चौकातील राजमोती लॉन मंगल कार्यालयाला नोटीस बजावली. त्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रोफेसर कॉलनीजवळील वादग्रस्त राजमोती लॉन पाडण्याचा आदेश महापालिकेने दहा दिवसांपूर्वी काढला आहे. तशा नोटिसा संबंधितांना दिल्या आहेत. पंधरा दिवसांत लॉनचे बांधकाम उतरवून घेण्याचे सांगण्यात आले आहे. लग्न व इतर कार्यक्रमांसाठी हे लॉन भाडेपट्ट्याने दिले जाते. अशा वेळी लग्नासाठी व इतर कार्यक्रमांसाठी येणाºयांची वाहने रस्त्यावरच लावलेली असतात. अशा बेजबाबदार पार्किंगमुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी होते. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने पाहणी करून या संबंधितांना नोटीस बजावली आहे.
महापालिकेत नोंदणी झालेली सुमारे 48 मंगल कार्यालये आहेत, तर नोंदणी न झालेली ही काही मंगल कार्यालये शहराच्या मध्यवर्ती भागात गल्लीबोळांमध्ये आहेत. या कार्यालयांना वाहनतळांची सुविधाच नाही. त्यामुळे लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांसाठी अशा ठिकाणी येणारे नागरिक गल्लीबोळांत अस्ताव्यस्त पद्धतीने वाहनांचे पार्किंग करतात. त्यामुळे या गल्लीबोळांत अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. चितळे रोड, बागडपट्टी तसेच औरंगाबाद, मनमाड, पुणे व कल्याण महामार्गावरही मंगल कार्यालयांची संख्या वाढली आहे. काही (महामार्गांवर असलेल्या) मंगल कार्यालयांना वाहनतळांची सुविधा आहे. परंतु, शहराच्या मध्यवर्ती भागातील गल्लीबोळांमध्ये असलेल्या कार्यालयांना वाहनतळांची सुविधाच उपलब्ध नाही. शिवाय अशा गल्लीबोळांमध्ये वाहतूक पोलिस फिरकत नाहीत. त्यामुळे ही वाहतुकीची कोंडी काही तास कायम राहते. ज्या मंगल कार्यालयांना पार्किंग नाही, त्या मंगल कार्यालयाकडे मनपा प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे.

पोलिसांनी कारवाई करावी
शहरात आधीच वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झालेला आहे. वाहतूक नियमन करणारे पोलिस चौकांमध्येच फारसे दिसत नाहीत. तेव्हा ते गल्लीबोळांत कशाला येतील. लग्नसमारंभ तसेच इतर कार्यक्रमांसाठी मंगल कार्यालयांचे मालक मोठ्या रकमेच्या पावत्या फाडतात. मग, त्यांना वाहनतळ बांधण्यात काय अडचण आहे. वाहनतळ नाही, त्यांच्याकडून महापालिकेने दंड वसूल केला पाहिजे.’
राहुल माळी, नागरिक, नगर.

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
शहरातील बहुतांशी मंगल कार्यालयांना वाहनतळांची सुविधाच उपलब्ध नाही. हे वास्तव आहे. मुळात या मंगल कार्यालयांची बांधकामे सुरू असतानाच महापालिकेने पाहणी करून मंगल कार्यालयांना वाहनतळ बांधणे बंधनकारक करणे अपेक्षित आहे. परंतु, तसे होत नाही. आतापर्यंत मनपाने एकाही मंगल कार्यालयांवर कारवाई केलेली नाही. राजमोती मंगल कार्यालयाला केवळ नोटीस बजावण्याचे काम मात्र महापालिकेने केले आहे.