आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar City\'s Street Light Audit Come Into Final

नगर शहरातील पथदिव्यांच्या ऑडिटचे काम अंतिम टप्प्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगरोत्थान अंतर्गत शहरातील पथदिव्यांच्या ऑडिटचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतनमार्फत हे ऑडिट सुरू आहे. या पथकाने वेगवेगळ्या भागातील 4 कोटी रुपयांच्या सहा कामांची तपासणी केली असून येत्या पंधरा दिवसांत अहवाल सादर होणार आहे. या अहवालात पथदिव्यांच्या कामातील गैरव्यवहार समोर येणार असल्याने संबंधित ठेकेदार अस्वस्थ झाले आहेत.

पथदिव्यांच्या कामातील गैरव्यवहार ‘दिव्य मराठी’ने उघड केल्याने महापालिका प्रशासनाला या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या कामासाठी सुरूवातीला शहरातील शासकीय तंत्रनिकेतन व विळद येथील विखे अभियांत्रिकी महाविद्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला, परंतु त्यांनी नकार दिल्याने मनपाने पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतनकडे हे काम सोपवले. त्यासाठी त्यांना 7 लाख 38 हजार रुपयांचे शुल्क देण्यात आले. तंत्रनिकेतनच्या 6 तज्ज्ञ प्राध्यापकांकडून गेल्या दीड महिन्यापासून पथदिव्यांच्या ऑडिटचे काम सुरू आहे. खांबांची उंची, काँक्रिटीकरण, वायर, अर्थिंग, फिटींग, तसेच एलईडी दिव्यांची लक्स लेव्हल यांची तपासणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्युतीकरणाच्या कामाची एस्टिमेट कॉपी, डीएसआर दर आदी कागदपत्रांची छाननीही करण्यात आली आहे. उर्वरित तपासणीचे काम येत्या आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर पथकाकडून मनपा आयुक्त विजय कुलकर्णी यांना अहवाल सादर करण्यात येईल.

अमरधाम ते एमएसईबी सबस्टेशन रस्ता, वन विभाग कार्यालय ते शहाशरीफ दर्गा, जुने ग्रामपंचायत कार्यालय ते संजोगनगर, पाइपलाइन रोड यासह शहरातील विविध ठिकाणचे एलईडी दिवे, अप्पू हत्ती चौक ते राज चेंबर अशा सुमारे 4 कोटींच्या कामांची तपासणी करण्यात आली. या कामात वापरलेल्या साहित्याचे नमुने गोळा करून त्यांची तंत्रनिकेतनच्या अद्ययावत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यामुळे पथदिव्यांच्या कामातील मोठा गैरव्यवहार समोर येण्याची शक्यता आहे. या कामाच्या थर्ड पार्टी ऑडिटची कार्यवाही अनेक महिन्यांपासून रखडली होती.
नगरविकासच्या आदेशाला ठेंगा

पथदिव्यांच्या कामाबाबत तक्रारी आल्याने नगरविकास विभागाने मनपाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. सहा महिने झाले, तरी प्रशासनाने कोणताही अहवाल सादर केलेला नाही. ऑडिट झाल्यानंतरच नगरविकास विभागाला अहवाल सादर करण्यात येईल, असे आता प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
उर्वरित बिले थांबवता येतील

पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतनकडे सुसज्ज प्रयोगशाळा आहे. तेथील 6 तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत ऑडिट सुरू आहे. संबंधित ठेकेदारांनी आतापर्यंत केलेल्या कामांची 20 टक्के बिले प्रलंबित आहेत. ऑडिटमध्ये पथदिव्यांच्या कामाबाबत काही त्रुटी दिसून आल्या, तर ठेकेदारांची बिले थांबवता येतील.’’ बाळासाहेब सावळे, विद्युत विभागप्रमुख, मनपा