आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून सीटी स्कॅन मशीन नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरच्या जिल्हा रुग्णालयात नवे आधुनिक सीटी स्कॅन मशीन येणार म्हणून येथील आधीचे सीटी स्कॅन मशीन नोव्हेंबरमध्ये दुसरीकडे हलवण्यात आले. मात्र, नवीन मशीन येत नसल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सीटी स्कॅनसाठी रुग्णांना बाहेर जावे लागत आहे. त्यामुळे त्यांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. नवे मशीन येण्यासाठी सध्यातरी कोणतीही हालचाल दिसत नाही.
जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांची मोठी गैरसोय होते. येथील सीटी स्कॅन मशीनमध्ये चाचण्या करण्याचा दर फक्त तीनशे रुपये आहे. बाहेर ते करण्यासाठी दीड ते अडीच हजार रुपये लागतात. यावरून रुग्णाची कशी आर्थिक पिळवणूक होत असेल, याची कल्पना यावी. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या सामान्य रुग्णाचे या खर्चामुळे अक्षरश: आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले जाते. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सर्व जिल्हा रुग्णालयांतील आधीचे सीटी स्कॅन मशीन उपजिल्हा रुग्णालयांत पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार नगरचे मशीन नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे पाठवण्यात आले. वास्तविक पाहता हे मशीन कळवणला पाठवण्याचा निर्णय झाला, तेव्हा तेथील प्रशासनाने सीटी स्कॅन मशीनची गरज नाही ते ठेवण्यास जागा नसल्याचे कळवले होते. मात्र, वरिष्ठ पातळीवरूनच तसा निर्णय झाल्याने २८ नोव्हेंबरला मशीन कळवणला पाठवण्यात आले.

नगरचे सीटी स्कॅन मशीन फार थोडा काळ सुरू राहायचे. मशीन कळवणला पाठवण्याआधी महिनाभर ते बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय जी व्हायची ती झालीच. आता तर मशीनच नसल्याने रुग्णांना नाइलाजाने बाहेरची महागडी सेवा घ्यावी लागत आहे.

बांधकाम पूर्ण होताच नवे मशीन बसवण्यात येणार
^राज्यस्तरावरून राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतून सीटी स्कॅन विभागाचे काम सध्या सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन कळवण येथे पाठवण्यात आले आहे. विप्रो कंपनीकडून काम सुरू असून बांधकाम पूर्ण होताच नवे मशीन बसवण्यात येणार आहे. वरिष्ठ स्तरावरील विषय असल्याने स्थानिक पातळीवर आम्हाला निर्णय घेता येत नाही.'' संजयराठोड, कार्यालयीनअधीक्षक, जिल्हा रुग्णालय.

आता सेवा होणार महाग

जिल्हा रुग्णालयात येणारे नवे सीटी स्कॅन मशीन महागडे आहे. त्याची सेवा खासगीकरणातून देण्यात येणार आहे. त्यामुळे ती पहिल्यासारखी रुग्णांना परवडणारी असेल का, याबद्दल कोणीही काहीही बोलत नाही. आता सीटी स्कॅन मशीन एकूण रेडिओलॉजी विभागच खासगीकरणातून चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजे त्याची सर्व यंत्रसामग्री एका कंपनीची असेल. यंत्र सामग्रीबरोबरच ती चालवणारे मनुष्यबळही संबंधीत कंपनीचे असेल. सर्व यंत्रांची देखभालही कंपनीच करणार असल्याने त्यांचे मनुष्यबळ अधिक असणार आहे.
या मनुष्यबळाचा यंत्रसामग्रीच्या देखभालीचा खर्च जनतेच्या खिशातूनच केला जाणार असल्याने जिल्हा रुग्णालयातील सेवा महागणार आहेत.

सरकारी सेवेवर खासगीकरणाचे सावट
खासगीकरणाचेसावट जिल्हा रुग्णालयाच्या सर्व सेवांवर पडले आहे. पहिला क्रमांक रेडिओलॉजी विभागाचा लागला आहे. या विभागाच्या सर्व सेवा एक कंपनी पुरवणार आहे. जिल्हा रुग्णालयातील सध्याचे कर्मचारी आधीचे सीटी स्कॅन मशीन हाताळत होते. आता या कर्मचाऱ्यांना उपजिल्हा रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांत जावे लागणार आहे. त्यांना कधीही जिल्ह्याच्या ठिकाणी नेमणूक मिळणार नाही, याची धास्ती या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यांवर जाणवते.

नवीन मशीन कधी येणार

लवकरचनवीन आधुनिक सीटी स्कॅन मशीन येणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून समजली. मात्र, ते कधी येणार हे कोणीही सांगू शकत नाही. आता जे मशीन येणार आहे, त्याची किंमत तीन कोटी आहे. ते लवकर येण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हे यंत्र आल्यावर त्याची सेवेबाबत साशंकता आहे.

सेवा कायम खंडित

जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीनची रुग्णांना कधीच अखंडित सेवा मिळाली नाही. हे मशीन काही दिवस चालायचे बंद पडायचे. त्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी कायम विलंब व्हायचा मशीन धूळखात पडायचे. नंतर ते कधीतरी दुरुस्त केले जायचे, अशी माहिती समजली. त्यामुळे रुग्णांमध्ये संताप व्यक्त होत आहे.