आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगर तालुका सहकारी साखर कारखान्याला ग्राहक मिळेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर तालुका सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने 70 कोटींच्या थकीत कर्जापोटी विक्रीस काढला आहे. त्यासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया करण्यात आली. मात्र, दिलेल्या मुदतीत एकही निविदा दाखल न झाल्याने कारखान्याची किंमत 70 कोटींवरून 61 कोटींपर्यंत कमी करण्यात आली. त्यासाठी पुन्हा लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

कारखाना उभारणीसाठी राज्य सहकारी बँकेसह इतर 7 बँकांकडून कर्ज घेण्यात आले होते. या कारखान्याने सन 2002 मध्ये पहिला गळीत हंगाम सुरू केला होता. 2500 मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला हा कारखाना एकाही हंगामात पूर्ण क्षमतेने गाळप करू शकला नाही. परिणामी कर्जाचे व्याजही कारखाना बँकांना परत करू शकला नाही. कर्जाची रक्कम वाढत जाऊन 70 कोटींपर्यंत गेली. किमान कर्जावरील व्याज थांबावे या हेतूने दोन वर्षांपूर्वी सर्व संचालकांनी एकत्रित येत कारखाना अवसायनात काढण्याची विनंती राज्य सहकारी बँकेला केली होती. कारखाना अवसायनात निघाल्यानंतर वेळोवेळी नोटीस देऊनही कारखान्याने कर्जाचीरक्कम न फेडल्याने राज्य सहकारी बँकेने हा कारखाना अखेर विक्रीस काढला. जून महिन्यात वृत्तपत्रांत जाहिरात देऊन 10 जुलैपर्यंत निविदा दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. पण 70 कोटींना हा कारखाना विकत घेण्यासाठी एकही निविदा दाखल झाली नाही. त्यामुळे राज्य सहकारी बँकेने कारखान्याचे किमान मूल्य 61 कोटींपर्यंत कमी केले. आता पुन्हा नव्याने लवकरच निविदा प्रकिया राबवण्यात येणार आहे.