आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यांना पक्षाची जबाबदारी झेपत नाही त्यांनी बाजूला व्हावे..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पक्ष कार्यालयात भाषणबाजी करण्यापेक्षा चिंतन बैठकीत भाग घ्यावा, असे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करीत काँग्रेसचे पक्षनिरीक्षक मनसुख चोरडिया यांनी ज्यांना पक्षाची जबाबदारी झेपत नसेल, त्यांनी या जबाबदारीतून बाजूला व्हावे, असा टोला लगावला.

काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात शहर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत चोरडिया बोलत होते. शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, ज्येष्ठ नेते भास्करराव डिक्कर, प्रा. राजेंद्र गायकवाड, प्रा. विनोद जाधव, नगरसेवक बाळासाहेब पवार, महिला अध्यक्ष सविता मोरे, भिंगारचे अध्यक्ष रामकृष्ण पिल्ले, अँड. अनुराधा येवले, नलिनी गायकवाड, मंगल भुजबळ, प्रशांत गज्रे आदी या वेळी उपस्थित होते.

चोरडिया म्हणाले, केवळ भाषणबाजी करण्यापेक्षा सर्वांनी चिंतन बैठकीत सहभाग घेणे गरजेचे आहे. प्रदेश किंवा जिल्हा काँग्रेस कमिटीने दिलेली जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी. बूथ प्रतिनिधी निवड प्रक्रियेत स्थानिक नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांनी भाग घेऊन ब्लॉक व जिल्हाध्यक्षांना सहकार्य करावे; अन्यथा या सर्व बाबी निरीक्षक या नात्याने प्रदेशाध्यक्षांसमोर उपस्थित केल्या जातील, असे ते म्हणाले.

राज्य व केंद्र सरकारच्या योजना काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. आधार कार्ड योजनेला विरोधकांनी प्रथम विरोध केला. मात्र, ही योजना लोकोपयोगी ठरत असताना विरोधकच या योजनेच्या कार्यात भाग घेऊ लागले आहेत, असे चोरडिया म्हणाले.

नगर जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने घेतलेले निर्णय दुष्काळग्रस्त भागांपर्यंत कसे पोहोचतील याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

गटबाजी चव्हाट्यावर
काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उबेद शेख व शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्यात सध्या परस्परविरोधी वक्तव्ये सुरू आहेत. दररोज एकमेकांविरोधात पत्रके निघत आहेत. त्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष निरीक्षक चोरडिया यांनी बैठकीत चांगला समाचार घेतला.