आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पारगमन’साठी उद्या मनपाची महासभा ; नगरसेवक प्रशासनाला धारेवर धरणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेच्या पारगमन वसुलीबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारी (11 जुलै) महासभा घेण्यात येणार आहे. पारगमन वसुलीचा तिढा सोडविण्यासाठी तातडीने महासभा घेण्याची मागणी 34 नगरसेवकांनी केली होती. त्यामुळे पारगमनच्या मुद्दय़ावरून नगरसेवक प्रशासनाला धारेवर धरणार असल्याने सभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
मनपा प्रशासनाने पारगमन वसुली करण्यास जकात अभिकर्ता विपुल ऑक्ट्रॉय सेंटर या संस्थेला मुदतवाढ दिली. या निर्णयास पदाधिकारी व काही नगरसेवकांनी विरोध केला आहे. प्रशासनाने पदाधिकार्‍यांना अंधारात ठेवून पारगमन वसुलीची परवानगी दिली, त्याचबरोबर परवानगी देण्यासाठी मोठय़ा प्रमाणात अर्थिक देवाण-घेवाण झाली असल्याचा आरोप उपमहापौर गीतांजली काळे यांनी केला आहे. पारगमन वसुलीच्या परवानगीबाबत निर्णय घेण्यासाठी स्थायी समिती अस्तित्त्वात नसल्याने महासभेत निर्णय घेण्यात यावा, त्यासाठी तातडीने महासभा घेण्यात यावी, अशी मागणी 34 नगरसेवकांनी महापौर शीला शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार महापौरांनी प्रशासनास प्रस्ताव पाठविण्याची सुचना केली होती. मात्र, घरकुल योजनेवर प्रकल्प व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यासाठी स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याने त्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्त विजय कुलकर्णी यांनी नगरसचिवांना दिले होते. त्यामुळे महासभा घेण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यता होती. स्थायी समिती अस्तित्वात नसल्यामुळे महासभा घेण्यात यावी, अशी मागणी स्थायीच्या चार नगरसेवकांनीही केली.
उपमहापौर काळे यांच्यासह स्थायीच्या चार सदस्यांच्या मागणीनुसार महासभेचा प्रस्ताव नगरसचिव विभागाने सादर केला आहे. त्यास महापौर शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. प्रशासनाने विपुलला बेकायदेशीरपणे परवानगी दिली असून, त्याबाबत महापौर-उपमहापौर यांच्यासह काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. उपमहापौर काळे यांनी तर, पारगमन वसुलीस परवानगी देणार्‍या आयुक्त व उपायुक्तांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला होता. त्यामुळे पारगमनचा वाद आणखी चिघळला आहे. यावरून सभेत प्रशासनाला धारेवर धरण्यात येणार आहे.
16 जुलै रोजी विशेष सभा - महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य नुकतेच निवृत्त झाले असून, नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी विशेष सभा घेण्यात येणार आहे. जेवढे सदस्य निवृत्त झाले, पुन्हा तेवढय़ाच सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यासाठी 16 जुलै रोजी विशेष सभा घेण्यात येणार आहे.