आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेचे अंदाजपत्रक उद्या सादर होणार: नगरकरांवर मालमत्ता करवाढीची टांगती तलवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मनपा प्रशासन २०१५-१६ या वर्षाचे अंदाजपत्रक बुधवारी महासभेसमोर सादर करणार आहे. प्रशासनाने विविध करांत ५ ते २० टक्क्यांपर्यंतची करवाढ सुचवली आहे.
महासभेने त्यास मंजुरी दिल्यास नगरकरांना करवाढीस तोंड द्यावे लागणार आहे. करवाढ असल्यास अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपूर्वी मंजूर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे महासभा करवाढीबाबत काय निर्णय घेते, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
मनपा प्रशासनाने मागील वर्षी तब्बल ५९३ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. स्थायी समितीच्या सभेत त्यावर चार ते पाच दिवस चर्चा झाली. यावेळी मात्र स्थायी समिती सभापतिपदाची निवड न झाल्याने अंदाजपत्रक महासभेसमोर सादर करावे लागणार आहे. मागील वर्षी अंदाजपत्रक सादर करण्यास उशीर झाल्याने त्यात कोणत्याही प्रकारची करवाढ करता आली नाही. यंदा मात्र २० फेब्रुवारीपर्यंत अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. बुधवारी होणाऱ्या महासभेत अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे. प्रशासनाने यापूर्वीच स्थायी समितीमध्ये काही करवाढीचा विषय मंजुरीसाठी ठेवला होता. परंतु स्थायी समितीने या विषयास स्थगिती दिली होती. करवाढ करायची असेल, तर अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत मंजूर करणे बंधनकारक आहे.
महापौरांनी दोन दिवस आधीच महासभा बोलावल्याने करवाढ होण्याची शक्यता आहे. अग्निशमन कर, मलनिस्सारण कर, वृक्ष कर, घनकचरा कर अशा विविध प्रकारच्या चौदा करांमध्ये प्रत्येकी पाच ते वीस टक्क्यांपर्यंतची करवाढ, तसेच काही नवीन कर नागरिकांवर लादण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंदाजपत्रकीय सभेकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
तरतूद करूनही रखडलेली विकासकामे जैसे थे

प्रशासनाने मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ न करता रखडलेल्या विकासकामांवर भर दिला होता. त्यात पाणी योजना, नगरोत्थान, घरकुल, नाट्यगृह, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अग्निशमन सेवा, तसेच घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून शहर विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु घरकुल योजना वगळता अन्य विकासकामांची परिस्थिती वर्षभरानंतरही जैसे थे आहे.