आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजीची गाडी हेच नगरसेविका कलावतीबाईंचे संपर्क कार्यालय, विजयी झाल्यानंतरही भाजी विक्री सुरूच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भाजी घ्या भाजी.. ताजी ताजी भाजी..मेथी, पालक, कोबी, फ्लॉवर, वांगी.. असा शेळके मावशींचा आवाज वॉर्ड क्रमांक 11 मध्ये सकाळी नित्यनेमाने ऐकू येतो. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कलावती सूर्यभान शेळके ऊर्फ भाजीवाल्या मावशी नगरसेविका झाल्या. नगरसेविका होण्यापूर्वी आणि झाल्यानंतरही त्यांनी आपला व्यवसाय पूर्वीच्याच जोमाने सुरूच ठेवला आहे.
कलावती शेळके 60 वर्षांच्या आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर त्यांनी भाजपच्या नीलिमा गायकवाड यांचा पराभव केला. कलावती मूळच्या येवती पाडळी (ता. श्रीगोंदे) येथील. विवाहानंतर त्या नगरला आल्या. त्यांचे पती मंगलगेट येथील दिलबाग गॅरेजमध्ये दिवाणजी म्हणून काम करत. हडको वसाहतीत त्यांचे घर आहे. संसाराला हातभार लागावा, यासाठी गेल्या 32 वर्षांपासून कलावती भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. पूर्वी डोक्यावर भाजीची पाटी घेऊन त्या हडको, तारकपूर, कँटीन परिसरात पायी फिरत. आता त्या हातगाडीवर भाजी विकतात.
मागील निवडणुकीत कलावती राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभ्या होत्या. त्या वेळी अवघ्या 18 मतांनी त्या पराभूत झाल्या. या वेळी मात्र त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र, नगरसेविका झाल्यानंतरही त्यांच्या वागण्या-बोलण्यात कोणताही बदल झालेला नाही. कलावती शेळके म्हणाल्या, परिसरातील सर्व मतदारांचे आणि माझे घरोब्याचे संबंध आहेत. निवडणूक काळातही माझा भाजी विक्रीचा व्यवसाय सुरूच होता आणि यापुढेही सुरू राहील. भाजी विकता विकता मी प्रचार केला. भाजीची गाडी हेच माझे संपर्क कार्यालय असेल अन् सकाळी सकाळी मी जनतेच्या दारात असेन..
महापालिका निवडणुकीत लाखोंचा खर्च झाल्याचे बोलले जाते, पण मला तर मतदारांनी शासकीय खर्चापेक्षाही कमी खर्चात नगरसेविका केले. वॉर्डात दररोज फिरत असल्याने येथील मूलभूत प्रश्नांची मला जाणीव आहे आणि ते सोडवण्यावर माझा भर असेल, असे कलावती मावशी म्हणाल्या.
मावशी आमच्यातल्याच
नगरसेविका झाल्या तरी त्या कायम आमच्यातच राहणार आहेत. नगरसेविका दररोज गल्लीत येणार असल्याने त्यांना प्रश्न सांगता येतील आणि हक्काने सोडवूनही घेता येतील.. ’’ सविता क्षीरसागर, गृहिणी.
मनमिळाऊ स्वभाव
कलावती मावशींचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ आहे. सर्वांच्या सुख-दु:खात त्या सहभागी होतात. त्या सुधारणा करतील याची खात्री आहे.’’ वसंत सोनवणे, नागरिक.
छायाचित्र - कलावती मावशी नगरसेविका म्हणून निवडून आल्या असल्या तरी दररोज सकाळी हातगाडीवरून भाजी विकण्याचा व्यवसाय त्यांनी चालूच ठेवला आहे.