आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Corporater Agressive In Special GB Meeting

नगरसेवकांनी धरले अधिकार्‍यांना धारेवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सावेडी व केडगाव भुयारी गटार योजनेच्या वाढीव खर्चास महापालिकेच्या विशेष सभेत बुधवारी मंजुरी देण्यात आली. योजनेसाठी पाठपुरावा केल्याबद्दल महापौर शीला शिंदे व आयुक्त विजय कुलकर्णी यांचे सभेत अभिनंदन करण्यात आले. मात्र, मनपाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कामाबाबत अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करून प्रशासनावर ताशेरे ओढले.

राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या सावेडी व केडगाव भुयारी गटार योजनेचा पुन:प्र्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी योजनेच्या वाढीव खर्चास सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्यक असल्याने ही विशेष सभा बोलावण्यात आली होती. सभेत योजनेच्या वाढीव खर्चास एकमताने मंजुरी देण्यात आली. मात्र, अनेक नगरसेवकांनी भुयारी गटार योजनेऐवजी दुसर्‍याच विषयांवर चर्चा करून अधिकारी व कर्मचार्‍यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. एलबीटीसाठी नेमलेल्या कर्मचार्‍यांचे काम समाधानकारक नाही. त्यामुळे या कर्मचार्‍यांची बदली दुसर्‍या विभागात करावी, अशी मागणी नगरसेवक गणेश भोसले यांनी केली. बाळासाहेब बोराटे यांनी एलबीटीसाठी उपायुक्त दर्जाच्या स्वतंत्र अधिकार्‍याची शासनाकडे मागणी करावी, तसेच मालमत्ता करावरील शास्तीच्या रकमेत 50 ऐवजी शंभर टक्के सूट द्यावी, असे सांगितले. एलबीटी, पारगमन व पूर्वीच्या जकातीच्या उत्पन्नात निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. मालमत्ता करावरील शास्तीच्या रकमेत मात्र शंभर टक्के सूट देता येणार नसल्याचे आयुक्त कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर बोराटे यांनी तीर्थक्षेत्र विकास निधीअंतर्गत हाती घेतलेल्या कामांचा मुद्दा उपस्थित करून शहर अभियंता एन. बी. मगर यांना धारेवर धरले. ग्रामदैवत विशाल गणपती परिसराच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे, परंतु शहर अभियंत्यांनी एकदाही या कामाची पाहणी केली नाही. ठेकेदारांची बिले मात्र काढण्यात आली, असा आरोप बोराटे यांनी केला. संभाजी कदम यांनीही अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जात नसल्याचा आरोप केला.

भोसले यांनी वसुंधरा महोत्सवांतर्गत करण्यात आलेल्या वृक्षलागवडीचा मुद्दा उपस्थित करून संबंधित कर्मचार्‍यांवर ताशेरे ओढले. नगरसेवक दुसर्‍याच विषयावर चर्चा करत असल्याने आयुक्त व महापौरांनी विशेष सभेचे संकेत पाळण्याच्या सूचना केल्या. मात्र, नगरसेवकांनी त्या धुडकावल्या. बांधकाम विभागातील गहाळ झालेल्या फायलींबाबतही नगरसेवकांनी आयुक्तांना जाब विचारला. फायली कोणी गहाळ केल्या, हे उपायुक्त व शहर अभियंता मगर यांना माहीत असल्याचा आरोप अंबादास पंधाडे यांनी केला.

नगरसेवकांनी सहकार्य करावे
जकात बंद झाल्याने मनपाच्या उत्पन्नात मोठी तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी नगरसेवकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. मालमत्ताकराची थकबाकी भरण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वॉर्डातील थकबाकीदाराला प्रोत्साहित करावे, असे आयुक्त कुलकर्णी म्हणाले.

जगताप यांचे अभिनंदन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या संग्राम जगताप यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव त्यांच्या पक्षातील एकाही नगरसेवकाने मांडला नाही. शेवटी बाळासाहेब बोराटे यांनी हा प्रस्ताव सभेसमोर मांडल्यानंतर उशिरा का होईना, पण राष्ट्रवादीचे नगरसेवक आरिफ शेख यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन जगताप यांचे अभिनंदन केले.