आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
श्रीरामपूर - राष्ट्रवादी कॉँग्रेसचा माजी नगरसेवक आयूब शेख यांच्या हत्येप्रकरणातील रिजवान फारूख शेख व शोएब ऊर्फ सैद उस्मान सय्यद (दोघेही फकिरवाडा, श्रीरामपूर) या दोघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर अन्य सहाजणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
जुबेर अश्पाक शेख, भैयू ऊर्फ अब्दुल अब्बासखान पठाण, बाळा ऊर्फ रवींद्र राजेंद्र त्रिभुवन, राजेंद्र भानुदास भालेराव, संदीप बाबुराव वाघमारे (सर्व श्रीरामपूर) व नीलेश सुरेश अल्हाट (पुणे) हे सहा जण पुराव्याअभवी निर्दोष ठरले. या प्रकरणातील वसिम गुलाब शेख हा आरोपी अद्याप फरार आहे. शहरातील मौलाना आझाद चौकात 8 जानेवारी 2010 रोजी मध्यरात्री अकरा वाजता माजी नगरसेवक आयुब शेख यांचा खून झाला होता. रिझवान शेख व शोएब सय्यद यांनी पिस्तुलातून शेख यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर सर्व फरार झाले होते. त्यांना अन्य सात आरोपींनी मदत केली होती. पूर्व वैमनस्यातून शेख यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात मनोज गुप्ता यांनी फिर्याद दिली होती. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला होता. आरोपींकडून दोन पिस्तुले व एक रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली होती. पोलिसांनी मुंबई येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी केली. या तपासणीत शेख यांच्यावर झाडलेल्या गोळ्या आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या पिस्तुलातूनच झाडण्यात आल्याचे निष्पन्न झाले. संगमनेरचे सरकारी वकील केशव गोडगे यांनी खटल्यात काम पाहिले. त्यांना तुषार चौदंते व सौरभ गदिया यांनी मदत केली. खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. तसेच प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. जे. एम. फारूकी यांनी शवविच्छेदन केले होते. तो पुरावा महत्त्वपूर्ण मानण्यात आला. त्यामुळे दोघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांचा जामीन मंजूर झालेला नव्हता. ते तुरुंगात असतानाच हा खटला चालला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.