आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Corporation Budget, Planning To Increase Water Tax

अंदाजपत्रक : पाणीपट्टी दुप्पट करण्याचा प्रस्ताव; ५१७ कोटींचे अंदाजपत्रक महासभेसमोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - एकीकडे नगर शहरातील ८० टक्के नागरिकांना दररोज पाणी मिळत नाही, तरीही महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकात पाणीपट्टीत दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. प्रभारी आयुक्त विलास वालगुडे यांनी बुधवारी महासभेसमोर २०१५-१६ या वर्षासाठी ५१७ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले.
पाणीपट्टीसह इतर सेवांच्या शुल्कांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ सूचवण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून जी कामे रखडली आहेत, त्यांच्यावरच अंदाजपत्रकात पुन्हा तरतूद करण्यात आली आहे.

आमदार तथा महापौर संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत प्रभारी आयुक्त वालगुडे यांनी अंदाजपत्रक सादर केले. यावेळी उपमहापौर सुवर्णा कोतकर, उपायुक्त अजय चारठाणकर व भालचंद्र बेहेरे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. प्रशासनाने अपेक्षितऐवजी प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न गृहित धरून ५१७ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यात घरगुती अर्धा इंच नळजोडाची पाणीपट्टी दीड हजारावरून तीन हजार रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
मनपाची अार्थिक घडी बसवण्यासाठी नगरकरांना बळीचा बकरा बनवण्याचाच हा प्रकार आहे. अनधिकृत नळजोडांकडे दुर्लक्ष करत उत्पन्नवाढीसाठी पाणीपट्टीत दुपटीने वाढ करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. मनपाकडे ९२ हजार मालमत्तांची नोंद आहे, अधिकृत नळजोडांची संख्या मात्र अजूनही आहे तेवढीच (४७ हजार ९७०) आहे. विशेष म्हणजे त्यात व्यावसायिक वापराच्या नळजोडांची संख्या अवघी ६२३ आहे. उत्पन्नवाढीसाठी अनधिकृत नळजोड अधिकृत करण्याचे सोडून प्रशासनाने पाणीपट्टीत दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ही नगरकरांची शुध्द फसवणूक आहे.
नगरकरांना आठवड्यातून जेमतेम चार दिवस पाणी मिळते. केडगाव उपनगरात तर आठवड्यातून एकच दिवस पाणी मिळते. असे असतानाही पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवणे कितपत योग्य आहे, याचा विचार नगरकर व लोकप्रतिनिधींना करावा लागणार आहे. प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर शुक्रवारी (२० फेब्रुवारी) सकाळी चर्चा होणार आहे. त्यात वाढीव पाणीपट्टीबाबत सत्ताधारी व विरोधक काय भूमिका घेतात, यावरच नगरकरांचे अार्थिक गणित ठरणार आहे.
आधी ‘फेज टू’चे पाणी मिळू द्या...

महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात करवाढ सूचवली आहे. नागरिकांना आठवड्यातून चार दिवस पाणी मिळत असतानाही पाणीपट्टीत दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे. याबाबत सत्ताधारी व विरोधक महासभेत काय निर्णय घेतात यावरच नगरकरांचे अार्थिक गणित ठरणार आहे. विरोधकांसह काही सत्ताधारी नगरसेवकदेखील या प्रस्तावांना विरोध करून ही वाढ हाणून पाडण्याच्या मनस्थितीत आहेत. एकदा ‘फेज टू’चे पाणी मिळू द्या, त्यानंतर वाढ करा, असे त्यांचे म्हणणे आहे.
काय म्हणते प्रशासन?

"निरंतर नगरसेवा' हे महापालिकेचे ब्रीद आहे. नगर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांवर पोहोचली आहे. साफसफाईच्या दृष्टीने नागरिकांना विविध सुविधा देण्याचा मानस आहे. आगामी वर्षात अतिक्रमणमुक्त रस्ते, सुशोभीत चौक, नियंत्रित वाहतूक व्यवस्था, विकास आराखड्यानुसार नगररचना अंमलबजावणी, मुबलक पाणी, तसेच सुनियोजित सांडपाण्याची व्यवस्था करून शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्याचा प्रयत्न राहील. शहर सुधारित पाणीपुरवठा योजना, नगरोत्थान अभियानांतर्गत रस्ते, घरकुल, तसेच ड्रेनेजलाइनची कामे लवकरच मार्गी लागतील, असे प्रभारी आयुक्त विलास वालगुडे यांनी अंदाजपत्रक सादर करताना सांगितले.
दृष्टिक्षेपातील शहरामधील विकासकामे

सावेडीत १३ एकर जागेत स्वतंत्र कचरा डेपो
शहराबाहेर मनपाच्या जागेत आधुनिक कत्तलखाना
पाणी पुनर्वापर योजनेंतर्गत विळद येथे प्रकल्प उभारणी
जीआयएसच्या माध्यमातून मालमत्तांचे सर्व्हेक्षण
पाणी योजनांच्या उर्वरित कामासाठी स्वतंत्र आराखडा
शहर विकास आराखड्यांतर्गत रस्त्यांची कामे
या सेवाही महागणार

- जन्म- मृत्यू नोंदीमधील दुरुस्तीसाठी २० रुपये शुल्क
- अग्निशमनाबाबतच्या प्रमाणपत्रासाठी १५० ऐवजी ५०० रुपये
- अग्निशमन स्टॅण्ड ड्युटी शुल्क १००० ऐवजी ३००० रुपये
- प्रत्येक करयोग्य मूल्यांचे दोन टक्के अग्निशमन कर लागू
- सिध्दिबागेतील जलतरण तलावाच्या शुल्कात पाच रुपये वाढ
- महालक्ष्मी उद्यानाच्या प्रवेश शुल्कात वाढ
- जाहिरात फलक शुल्कात चौपट वाढ
- विविध प्रकारच्या स्टॉलच्या शुल्कात दुप्पट वाढ