आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Corporation Employee Death In Road Accident In Nagar

बेपर्वाई : अवजड वाहतुकीने घेतला पुन्हा एक बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भरधाव जाणा-या ट्रकची धडक बसून महापालिकेतील कर्मचारी ब्रिजलाल चंद्रकांत बिज्जा (40, तोफखाना) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी सव्वादोन वाजता नगर-औरंगाबाद रस्त्यावरील टॉपअप पेट्रोल पंपासमोर झाला. अवैधरित्या शहरात येणा-या अवजड वाहतुकीनेच बिज्जा यांचा बळी घेतल्याचा आरोप करत महापौर संग्राम जगताप, कामगार नेते अनंत लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली मनपा कर्मचा-यांनी महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले. बाह्यवळण रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रशासन आणखी किती बळींची वाट पहात आहे, असा संतप्त सवाल कर्मचा-यांनी यावेळी उपस्थित केला.

बिज्जा महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात काम करत होते. टपाल नेण्याचे काम त्यांच्याकडे होते. बुधवारी दुपारच्या सुटीत जेवण आटोपून सायकलवरून ते महापालिकेत येत होते. टॉपअप पेट्रोल पंपासमोर पाठीमागून भरधाव वेगाने येणा-या मालमोटारीची (एमएच 23 बी 9347) त्यांना धडक बसली. बिज्जा यांचा जागीच मृत्यू झाला. काही मिनिटांतच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.

अपघाताची माहिती समजताच दोन पोलिस घटनास्थळी हजर झाले. परंतु सुमारे अर्धा तास रुग्णवाहिका आली नव्हती. त्यामुळे चिडलेल्या मनपा कर्मचा-यांनी महापौर जगताप व कामगार नेते लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर धाव घेतली. अवैध अवजड वाहतुकीकडे कानाडोळा करणा-या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकळे घटनास्थळी आले. त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. पण जोपर्यंत जिल्हाधिकारी स्वत: बाह्यवळण रस्त्याबाबत लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पावित्रा पदाधिकारी व कर्मचा-यांनी घेतला.
अपघाताचे वृत्त समजताच तहसीलदार कैलास पवार घटनास्थळी आले. त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. प्रवाशांना वेठीस धरणे चुकीचे असल्यामुळे कर्मचा-यांनी आंदोलन मागे घेतले. पण नंतर मनपात ठिय्या आंदोलन करण्यात आले. गुरुवारी (3 जुलै) सकाळी साडेदहा वाजता शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. बाह्यवळण रस्त्याबाबत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी स्वत: शोकसभेत येऊन लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी कामगार नेते लोखंडे यांनी केली.

वाहतूक तासभर ठप्प
अपघातामुळे औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. नंतर मनपा पदाधिकारी व कर्मचा-यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करताना पोलिसांच्या नाकीनव आले. औरंगाबादच्या दिशेने जाणारी वाहतूक टॉपअपमधून वळवण्यात आली.

आजही काम बंद
रास्ता रोको आंदोलन मागे घेतल्यानंतर महापालिकेसमोरील आवारात कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन केले. शहरातील बेकायदा अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करावी, बाह्यवळणचे रखडलेले काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी ठिय्या देण्यात आला. जिल्हाधिकारी लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कर्मचा-यांनी दिला.

जिल्हाधिका-यांच्या आदेशाला केराची टोपली
बाह्यवळण रस्ता तयार होऊनदेखील अवजड वाहतूक शहरातूनच जात असल्याने अनेकदा छोटे-मोठे अपघात होतात.त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. ‘दिव्य मराठी’ने सातत्याने बाह्यवळण रस्त्याबाबतचा प्रश्न मांडला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन अवजड वाहनांना शहरात पायबंद घालण्याच्या सूचना दिल्या, तसेच शहरात येणा-या अवजड वाहनांना बंदी घालण्याचा आदेश संबधितांना दिला होता. मात्र, तरीही अवजड वाहने शहरातूनच येत असून, अवजड वाहनचालकांनी जिल्हाधिका-यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

फोटो - नगर-औरंगाबाद रस्त्यावर मनपा कार्यालयासमोर ट्रकच्या धडकेने एका मनपा कर्मचा-याचा मृत्यू झाल्याने महापौरांसह संतप्त मनपा कर्मचा-यांनी बुधवारी एक तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. छाया : कल्पक हतवळणे