आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर वन विभागाने केली दीड लाख वृक्षलागवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - वन विभागाने यंदा तीन रोपवाटिकांत साडेपाच लाख रोपांची निर्मिती केली असून त्यापैकी एक लाख 56 हजार रोपांची अनेक ठिकाणी लागवडही केल्याची माहिती नगर-नेवासे वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल रमेश देवखिळे यांनी दिली.
देवखिळे म्हणाले, ‘‘या वर्षी नगर वन विभागाच्या औरंगाबाद रस्त्यावरील रोपवाटिकेत दोन लाख रोपांची निर्मिती केली. याशिवाय रोजगार हमी योजनेमार्फत नगर तालुक्यातील शेंडी येथील रोपवाटिकेत एक लाख 40 हजार, तसेच नेवासे फाटा येथील रोपवाटिकेतही दोन लाख रोपांची निर्मिती करण्यात केली.’’
‘‘वन विभाग वनक्षेत्रात दरवर्षी रोपे लावत असतो. त्यानुसार नगर तालुक्यातील पिंपळगाव येथे 50 हेक्टरवर 55 हजार, डोंगरगण येथे 25 हेक्टरवर 11 हजार सातशे, इमामपूर येथे 20 हेक्टरवर 21 हजार 300, देहरे येथे औषधी वनस्पतींच्या लागवडींतर्गत 20 हेक्टरवर 22 हजार, खांडके येथे 11 हेक्टरवर 21 हजार तीनशे, मोरे चिंचोले येथे 25 हेक्टरवर 27 हजार पाचशे रोपांची लागवड करण्यात आली. लागवड झालेल्या रोपांपैकी 20 टक्के रोपे जगणार नाहीत, असे गृहित धरून तेथे पुनर्लागवडीसाठी रोपे राखीव ठेवण्यात आली आहेत, ’’ असे ते म्हणाले.
या वर्षी पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. पाण्याची मोठी टंचाई जाणवत असतानाही वन विभागाने रोपे तयार करून ती उपलब्ध केली आहेत. एकूण रोपांपैकी 40 हजार झाडे विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आली आहेत. सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवडीसाठी ही रोपे दरवर्षी ठेवण्यात येतात. त्यांचा सरकारी दर अतिशय कमी आहे. स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही देवखिळे यांनी केले आहे.
25 प्रकारच्या रोपांची निर्मिती - वड, पिंपळ, सीताफळ, शिसू, कडूनिंब, बहावा, बोर, आवळा, कांचन, वावळा, खैर, बिब्बा, जांभूळ, अर्जुन सादडा, अडुळसा, हिरडा, बेहडा, बेल, करंज, तेटू, रिठा, आपटा, अँकॅशिया टॉटेलिस, गुळवेल, बांबू आदी प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.