आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायाधीशांविरुद्धचा बहिष्कार बारगळला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - विशिष्ट न्यायाधीशांकडून जाणीवपूर्वक त्रास होत असल्याचा सूर बहुतांश वकिलांनी शुक्रवारी बैठकीत व्यक्त केला. मात्र, दोन न्यायाधीशांवर बहिष्कार टाकण्याची बाब स्वाक्षरी करण्याच्या मुद्यावरून बारगळली. वकिलांच्या अडचणी मांडण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून प्रधान जिल्हा न्यायाधीशांची भेट घेण्याचे ठरवून ही बैठक गुंडाळण्यात आली.

बनावट पावती देऊन पक्षकाराची फसवणूक केल्याप्रकरणी अँड. तुळशीराम बालवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायालयाने दिल्यानंतर जिल्हा न्यायालयातील वकिलांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पाश्र्वभूमीवर शहर वकील संघाची तातडीची बैठक दुपारी दोन वाजता जिल्हा न्यायालयात झाली. संघाचे अध्यक्ष अँड. शिवाजी कराळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपस्थित असलेल्या बहुतांश वकिलांनी विशिष्ट न्यायाधीशांविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचला. संबंधित न्यायाधीशांसमोर चालणार्‍या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा मुद्दा पुढे आला. तसा ठराव मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. अँड. शिवाजी सांगळे यांनी दोन न्यायाधीशांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. अँड. शिवाजी डमाळे यांनी वकिलांना न्यायाधीशांकडून सन्मान मिळत नसल्याचा आरोप केला. फी मागितल्यानंतर पक्षकारांकडून वकिलांवर आरोप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

अँड. राजेश कोठारी यांनी कृती समिती तयार करुन प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडे अडचणी मांडण्याचा सल्ला दिला. कराळे यांनी बहिष्काराची मागणी करणार्‍या वकिलांनी अर्जावर सह्या करण्याचे आवाहन केले. स्वाक्षरीचा मुद्दा पुढे येताच वकिलांची संख्या रोडावण्यास सुरुवात झाली. अखेर कृती समितीच्या माध्यमातून वकिलांनी प्रधान जिल्हा न्यायाधीशांची भेट घेऊन संबंधित न्यायाधीशांविरुद्ध तक्रार करण्याचे ठरले.