आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर : एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येने शेवगाव हादरले, निर्घृण हत्याकांडामुळे पोलिसही चक्रावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर: शेवगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या झाली. हा प्रकार रविवारी सकाळी उजेडात आला. विद्या कॉलनीत राहणाऱ्या हरवणे कुटुंबीयांचे हत्याकांड झाल्यामुळे शेवगाव हादरले. वरकरणी चोरीच्या उद्देशाने हत्याकांड झाल्याचे दिसत असले, तरी खरे कारण वेगळेच असल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्या करण्याची पद्धत, त्यासाठी आरोपींनी केलेले ‘प्लॅनिंग’ पाहून पोलिसही चक्रावले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा स्वत: शेवगावात तळ ठोकून अाहेत. शेवगावकरांनी सोमवारी ‘बंद’ची हाक दिली आहे. 
 
लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयात नोकरीला असलेले अप्पासाहेब गोविंद हरवणे (वय ५८), त्यांची पत्नी सुनंदा अप्पासाहेब हरवणे (४८), मुलगी स्नेहल (१९) मुलगा मकरंद (१४) अशी हत्या झालेल्या चौघांची नावे आहेत. रविवारी सकाळी त्यांचा दूधवाला दूध घालण्यासाठी आला असता त्याने आवाज देऊनही कोणी घराबाहेर आले नाही. घराचा दरवाजा उघडाच असल्याने दूधवाल्याने घरात डोकावले. त्या वेळी त्याला हत्याकांड दृष्टीस पडले. दूधवाल्याने आरडाओरडा केल्याने शेजारी गोळा झाले. 
 
या घटनेची माहिती मिळताच शेवगाव उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिजित शिवथरे, पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हरवणे यांच्या घराचा परिसर प्रवेशाकरिता निषिद्ध करून वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, श्रीरामपूरचे अतिरिक्त अधीक्षक रोहिदास पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहायक निरीक्षक संदीप पाटील, फौजदार राजकुमार हिंगोले यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. 
 
अप्पासाहेब हरवणे हे लष्करी सेवेतून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर ते भूमी अभिलेख विभागात चौकीदाराचे काम करत होते. शेवगावपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या वडुले येथील ते रहिवासी होते. काही वर्षांपूर्वीच ते शेवगावात राहायला आले होते. विद्यानगर एरिगेशन कॉलनी हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. तरीही रात्री घडलेला प्रकार सकाळपर्यंत कोणाच्या लक्षात आला नव्हता. दूधवाला पोलिस आल्यानंतर शेजाऱ्यापाजाऱ्यांना हत्याकांडाची माहिती समजली. त्यामुळे शेजारीही संभ्रमावस्थेत आहेत. 
 
आज शेवगाव बंद 
हरवणे कुटुंबातील चौघांच्या मृतदेहांचा शवविच्छेदनपूर्व पंचनामा करून पोलिसांनी ते ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी हे मृतदेह औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह शेवगावात आलेले नव्हते. चौघांवरही त्यांच्या मूळ गावी वडुले येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या हत्याकांडाच्या निषेधार्थ शेवगाव ग्रामस्थांनी सोमवारी शेवगाव बंदची हाक दिली आहे. गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली जाणार आहे. 
 
ती मात्र वाचली 
सुनंदा हरवणे यांची सख्खी बहीण विद्यानगर कॉलनीतच राहायला आल्या आहेत. त्यांनाही सकाळी नऊनंतर या हत्याकांडाची माहिती मिळाली. अप्पासाहेब कुटुंबीयांचे स्वभाव मनमिळाऊ सरळमार्गी असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. त्यामुळे हरवणे कुटुंबीयांचे कोणाशीही वैमनस्य नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते. हरवणे यांची एक मुलगी शिक्षणासाठी परगावी राहत होती. त्यामुळे ती वाचल्याचे नातेवाईक म्हणत होते. या क्रूर हत्याकांडाचे नेमके कारण काय, असा प्रश्न पोलिसांसह सर्वांना पडला आहे. 
 
चोरी झालीच नाही? 
हरवणे कुटुंबीयांची हत्या करून घरातील सामानाची उचकापाचक केल्यामुळे पोलिसांना प्रथमदर्शनी हा चोरीचा प्रकार वाटला. मात्र, सुनंदा हरवणे यांच्या अंगावरील दागिने अप्पासाहेब हरवणे यांच्या खिशातील पैसे तसेच होते. कपाटाची उचकापाचक करून केवळ कपडे अस्ताव्यस्त टाकलेले होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हत्याकांड झाल्याचे भासवण्यात आल्याचे स्पष्ट आहे. घराचा दरवाजाही उघडाच होता. हत्या करण्यापूर्वी चौघांनाही गुंगीचे औषध दिले असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 
 
हातमोजा मिळाला 
घरात चौघांचे गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसले. धारदार शस्त्राने चौघांची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. बेडरूममधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त होते. दरवाजाचा कडी-कोयंडा शाबूत होता, तसेच कुलूपही लावलेले नव्हते. घराबाहेर एक पांढऱ्या रंगाचा हातमोजा पोलिसांना सापडला. श्वानपथकाने घरापासून रस्त्यापर्यंत माग काढला. न्याय वैद्यकीय विभाग ठसे तज्ज्ञांनीही पाहणी करून नमुने ताब्यात घेतले. 
 
पाच तपास पथके 
हरवणे कुटुंबीयांच्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिस शर्थीचे प्रयत्न करत आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा स्वत: शेवगावात तळ ठाेकून आहेत. शेवगाव पोलिस स्टेशन, उपअधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयाचे मिळून एकूण पाच तपास पथके या गुन्ह्याचा तपासाला लागले आहेत. वेगवेगळ्या शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हत्याकांडामुळे शेवगावात खळबळ उडाल्याने खुनाचे कारण शोधून आरोपींना पकडण्याचे आव्हान आहे. 
बातम्या आणखी आहेत...