आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराभोवती खंदक खोदून दांपत्याला कोंडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे (जि. नगर) - गावठाण हद्दीत घर बांधल्याच्या कारणावरून सांगवी येथील घराभोवती जेसीबीने खंदक खोदून वृद्ध दांपत्याला बंदिस्त केले. घर सोडा, अन्यथा ‘माळीण’प्रमाणे अवस्था करीन, अशी धमकीही सत्तरी ओलांडलेल्या रामचंद्र व कौसल्याबाई जगताप या दांपत्याला गावातील अशोक बाजीराव नलगे यांनी दिल्याचा आरोप या दांपत्याने केला आहे.

सरकारने दखल घेतली नाही तर स्वातंत्र्यदिनी याच खड्ड्यात जीवनयात्रा संपवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. झोपडीत आयुष्य काढल्यानंतर जगताप दांपत्याने उतारवयात छोटेसे घर बांधले. अशोक नलगे याचा या जागेशी व घराशी काहीही संबंध नाही. त्याची जागा शेजारी नसताना ‘घर का बांधले? तुम्ही येथे राहू नका, मी तुमची अवस्था माळीणप्रमाणे करीन,’ अशा धमक्या त्याने दिल्या. दोन ऑगस्टला नलगे याने जेसीबीच्या साहाय्याने घराच्या चहुबाजूने पंधरा फूट खोल, वीस फूट रुंद व चाळीस फूट लांब खंदक खोदला. त्यामुळे या दांपत्याला घरातून बाहेर पडणे अशक्य झाले. तीन दिवस तसेच काढल्यानंतर शेजार्‍यांच्या मदतीने ते कसेबसे घराबाहेर पडले.

सत्तरी ओलांडलेल्या जगताप दांपत्याने आपली कैफियत पोलिस निरीक्षक, अधीक्षक, तहसीलदार, प्रांताधिकारी आदींना देऊन चार दिवस उलटले तरीदेखील कोणीही त्यांची दखल घेतली नाही. ‘आम्ही मेल्यावर दखल घेणार का,’ असा संतप्त सवाल या दांपत्याने पत्रकारांशी बोलताना केला.

त्रास देणारा पोलिसांचा मित्र : जगताप दांपत्याने ज्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली आहे त्याचे राजकीय लागेबांधे असून तो आडदांड प्रवृत्तीचा असल्याचा आरोप दांपत्याने केला आहे. विशेष म्हणजे त्याचे पोलिस यंत्रणेशी सलोख्याचे संबंध आहेत. पोलिसमित्र असलेल्या या धनदांडग्यावर केव्हा कारवाई होते याकडे वृद्ध दांपत्याचे लक्ष लागले आहे.