आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडांना हद्दपारी; गुन्हेगारी टोळ्यांना मोक्का

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी कृष्णप्रहार करत नगर शहरासह जिल्ह्यातील गुंडगिरी मोडून काढली. मारामा-या, खून करणा-या गुन्हेगारांना तडीपार करण्याबरोबरच गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोक्कां’तर्गत कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवून त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.
कृष्णप्रकाश यांनी प्रथम अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला. गुन्हेगारी प्रवृत्तींना गाशा गुंडाळण्यास भाग पाडत नंतर त्यांनी राजकीय क्षेत्रातील गुंडगिरीवर जोरदार प्रहार केला. काँग्रेसचे भानुदास कोतकर व त्यांचे तीन पुत्र, तसेच ज्ञानदेव वाफारे यांच्यापाठोपाठ भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना त्यांनी कायद्याचे अस्तित्व दाखवून दिले.
राजकीय गुंडगिरीबरोबरच श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणा-या साईबाबांच्या शिर्डीमध्ये वाढलेल्या गुंडगिरीचा बंदोबस्तही कृष्णप्रकाश यांनी केला. पाकीटमार टोळीचा म्होरक्या पाप्या शेखच्या मुसक्या आवळून या टोळीविरुद्ध ‘मोक्का’चा प्रस्ताव त्यांनी तयार केला. नाशिकच्या मोक्का न्यायालयात तो दाखल करण्यात आला आहे. नेवासा परिसरात वाळू आणि गावठी कट्ट्यांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात गुंतलेल्या अण्णा लष्करे टोळीला जेरबंद करण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली. या टोळीतील 32 जणांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे. कृष्णप्रकाश यांच्या बेधडक कामगिरीमुळे त्यांनी नगरकरांच्या मनावर छाप निर्माण केली आहे.
शिर्डीतील पाप्याच्या टोळीचा बंदोबस्त - शिर्डीमध्ये 2005 ते 2011 या काळात पाप्या शेख आणि त्याच्या टोळीने हाहाकार माजवला होता. देशभरातून येणा-या साई भक्तांची लूट करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. पाकीटमारीपासून जीवे मारण्यापर्यंतची कृत्ये ही टोळी राजरोस करत होती. कृष्णप्रकाश यांनी या टोळीला बेड्या घातल्या. पाप्या शेखसह टोळीतील सतराजणांविरुध्द मोक्कांतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
अण्णा लष्करे टोळीच्या मुसक्या बांधल्या - औरंगाबाद येथील हल्ल्यात ठार झालेला नेवासा येथील कुख्यात गुंड अण्णा लष्करेच्या टोळीतील 31 जणांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाईच्या प्रस्तावावर शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश राठोड तपास करीत आहेत. या टोळीवर 2001 ते 2010 या पाच वर्षांच्या कालावधीत जीवे मारण्याचा प्रयत्न, दंगल, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आदी कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत. वाळू आणि गावठी कट्ट्यांची तस्करी करणा-या या टोळीने नेवासा परिसरात उच्छाद मांडला होता.
हे आहेत जिल्ह्यातील कुख्यात तडीपार - वर्षभरात सुमारे 65 गुन्हेगारांविरुद्धचे तडीपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून संबंधीत प्रांताधिका-यांकडे पाठविण्यात आले आहेत. यापैकी वाल्मिक वाहिद कुरेशी (जामखेड), पापा फरमान शेख (जामखेड), दिपक हिंमत मोहीते, मच्छिंद्र कान्हा रमेश पवार व सद्दाम सलीम मन्यार (तिघेही रा. अकोले) या पाच जणांचे तडीपारीचे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत, तर 2010 मध्ये दाखल झालेला सचिन राम इक्बाल यादव याच्या विरुद्धचा तडीपारीचा प्रस्ताव देखील मंजूर झाला आहे. याबरोबरच कोपरगाव तालुक्यातील टिळकनगर येथील संतोष सुखदेव वायकर याच्याविरुध्द ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.