आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar District Administration Issue , Divya Marathi

अहमदनगरमध्‍ये ‘इमर्जन्सी’ नव्हे, कारभारच ढिसाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर -पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रोहित्रांच्या देखभाल दुरुस्तीची (डीपी) कामे आता सुरू झाली आहेत. शहरात ब-याच ठिकाणी तारा लोंबकळत आहेत, तर काही ठिकाणी तारा उंचावर आहेत. त्यामुळे कधीही, कुठेही ‘फॉल्ट’ होऊ शकतो. फॉल्ट शोधल्यानंतर वीज जाणारच नाही, याची शाश्वती आम्ही देऊ शकत नाही, असे महावितरणचे अधिकारी सांगतात. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने महावितरणचा कारभार असा ढिसाळ झाला आहे. ‘इमर्जन्सी’च्या नावाखाली अधिकारी व कर्मचारी हात झटकतात.
काही भागांचा अपवाद वगळता भारनियमन नसल्याचा दावा महावितरण करत असले तरी प्रत्यक्षात नगरकरांना दररोज दोन-तीन तास विजेविना काढावे लागत आहेत. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार नवीन नाहीत. त्यावरून अनेक वेळा आंदोलने झाली आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यात वीज गुल होत असल्याने लहान मुलांचे, दम्याच्या आजार असलेले रुग्ण आणि वृद्धांचे हाल होत आहेत. यासंदर्भात महावितरणशी संपर्क साधल्यानंतर कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता ते सर्कल कार्यालयातील कॉल सेंटरवरील कर्मचारी वेगवेगळी कारणे सांगतात. महावितरणकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने ग्राहकांच्या संतापात भर पडत आहे.
सध्या राज्य 85 टक्के भारनियमनमुक्त असल्याचा दावा महावितरणतर्फे करण्यात येत आहे. मात्र, गेल्या महिन्याभरापासून ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’च्या नावाखाली दिवसा दोन-तीन तास आणि रात्रीही तीन-चार तास वीज गायब असते. कधी कधी दुपारी गेलेली वीज सायंकाळी येते. रात्री पुन्हा अचानक वीज जाते. सध्या उन्हाचा पारा 40 अंशावर गेला आहे. त्यामुळे उकाड्याने लोक हैराण होतात. वीज नसल्याने एखाद्या दिवशी अतिरिक्त भारनियमन (शनिवारची सवय झालीच आहे) झाले तरी कोणी नाराज होत नाही. पण महिनाभरापासून दिवसाआड काही भागात रात्री तीन-चार तास वीज नसते. महिनाभराचे वीज बिल थकले, तर महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. नियमित वीज बिल भरणा-या ग्राहकांनी चोवीस तास विजेची मागणी केली तर त्यात गैर काय?
ही कारणे सांगितली जातात...
वीज गेल्यानंतर ट्रान्सफॉर्मर जळाला, फॉल्ट सापडत नाही, फ्यूज उडाला आहे, कर्मचारी फॉल्ट शोधत आहेत, पाच ते दहा मिनिटांत वीज येईल किंंवा उशीर होईल, अशी उत्तरे महावितरणकडून मिळतात.
लिंक लाइनही रखडलेलीच...
शहरात सोलापूर रोड, एमआयडीसी, सावेडी, केडगाव, पॉवर हाऊस या पाच मुख्य वीज वाहिन्या आहेत. यापैकी एकाही वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास किंवा विजेची समस्या उद्भवल्यास दुस-या उपकेंद्रावरून पर्यायी व्यवस्था म्हणून एमआयडीसी ते सावेडीपर्यंत ‘लिंक लाइन’ टाकण्यात येणार होती. औरंगाबाद रस्ता, मनमाड रस्ता आणि पॉवर हाऊस येथे तीन रोहित्र बसवण्यात येणार होते. मात्र, वनविभागाने घेतलेल्या आक्षेपामुळे ही योजना रखडली आहे. त्यामुळे नगरकरांच्या हालात भर पडली आहे.
आमदार राठोड यांचीही नाराजी...
आमदार अनिल राठोड भारनियमन, खंडित वीजपुरवठा किंवा बिलांसंदर्भातील तक्रारी घेऊन जातात, त्या-त्या वेळी महावितरणच्या अधिका-यांनी त्यांना ठोस कारण न देता ते काम अमक्याकडे आहे, त्याला बोलवा म्हणून जबाबदारी झटकली. शुक्रवारी (23 मे) काढलेल्या मोर्चाच्या वेळी राठोड यांनी त्याच दिवशी सायंकाळी बैठकीची मागणी केली होती. महावितरणचे अधिकारी सक्षम नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणल्याचे राठोड यांनी या वेळी सांगितले.
कंट्रोलकडूनही ठोस उत्तर नाही
राज्यात विजेची मागणी वाढली की, ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’ची सूचना मुख्य कार्यालयाकडून अर्धा तास अगोदर देण्यात येते. मात्र, कुठे बिघाड, कुठे काय समस्या निर्माण झाली आहे याबाबत माहिती नसते. आम्ही फक्त वरिष्ठ व संबंधित भागातील अधिका-यांना ‘इमर्जन्सी’बाबत सूचना देतो, असे डीएसएस कंट्रोलरूमचे सहायक अभियंता व्ही. जी. भिवसने यांनी सांगितले.
...तर भारनियमनाची शिक्षा का?
भारनियमन नसतानाही महिनाभरापासून दिवसा दररोज दोन-तीन तास आणि रात्री दोन-तीन तास छुपे भारनियमन करण्यात येत आहे. भारनियमनाची कोणतीही सूचना दिली जात नाही. शहरात चोरीच्या वाढत्या घटना पाहता रात्रीच्या वेळी वीज जात असल्याने महिलांना असुरक्षित वाटते. शनिवारी (24 मे) सकाळी साडेआठ ते दुपारी दोन, त्यानंतर चार ते सायंकाळी साडेसहा आणि पुन्हा रात्री साडेसात ते पावणे नऊ अशी तब्बल सव्वानऊ तास वीज गुल होती. नियमित वीज बिल भरत असतानाही आम्हाला भारनियमनाची शिक्षा का?’’
अनिता बोरुडे, गृहिणी, बोरुडे मळा.