आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईने अंध मुलाला जाळून मारले, दारिद्र्याला कंटाळून मातेचाही आत्महत्येचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी (नगर) - काकडदरा तांड्यावरील राजू तुळशीराम पवार (४५) या अंध मुलाला जन्मदात्या आईने जाळून मारले. नंतर स्वत: विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दुष्काळ, आर्थिक विवंचना यामुळेच कुटुंब संपवण्याचा हा प्रकार घडल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा अाहे. पोलिसांकडे मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद नव्हती. सुमारे वर्षभरापूर्वी मृत राजूच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती. दरम्यान, राजूची आई भामाबाई तुळशीराम पवार (६५) यांच्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाथर्डीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर अत्यंत दुर्गम भागात काकडदरा तांडा आहे. गेल्या पाच वर्षांपासून या परिसरात पावसाचा पत्ता नाही. पवार यांच्या घरात कमावते कुणीही नाही. गेल्या दोन वर्षांपासून राजूने संजय गांधी योजनेचे मानधन मिळावे, यासाठी तहसीलदारांकडे अनेक हेलपाटे मारले. परंतु वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यांना दोन एकर जमीन असून त्याचेही दुष्काळी अनुदान वेळेवर मिळाले नाही. नुकतीच खरिपाची पेरणी केली. ते बियाणेसुद्धा पावसाअभावी वाया गेल्याने संपूर्ण कुटुंब नैराश्यात होते. सोमवारी दुपारी
बाराच्यासुमारास सून घराबाहेर गेली होती. आई भामाबाई अंध मुलगा राजू दोघेच घराच्या पडवीत बसले होते. अचानक आईने मुलाला पेटवून दिले. तो जळत असताना तीव्र नैराश्यापोटी तिने स्वत:ही विष घेतले. पोलिसांना खबर मिळताच उपनिरीक्षक कृष्णा जोपाळे पथकासह घटनास्थळी पोहोचले. जखमी राजूने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला नंतर प्राण सोडल्याचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, पोलिसांकडून याला दुजोरा मिळाला नाही. मृत राजूच्यामागे पत्नी, दोन विवाहित मुलींसह तीन मुली एक मुलगा असा परिवार अाहे.
बातम्या आणखी आहेत...