आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृती समितीचे नेतृत्व हजारेंकडे देण्याचा ठराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्हा विभाजनाच्या मागणीसाठीच्या जिल्हा विभाजन कृती समितीचे नेतृत्व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे सोपवण्याचा ठराव समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला. समितीच्या पहिल्या बैठकीला मिळालेला प्रतिसाद दुसर्‍या बैठकीत कमी झाल्याचे चित्र होते.

शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा विभाजन समितीची दुसरी बैठक शनिवारी झाली. गेल्या अनेक वर्षांपासून विभाजनाची मागणी प्रलंबित आहे. उत्तर विभागाचे जिल्ह्याचे केंद्र ठरवण्यावरून असलेला वाद यासाठी कारणीभूत आहे. पहिल्या बैठकीला उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींनी शनिवारच्या बैठकीकडे विविध कारणांनी पाठ फिरवली, तर पहिल्या बैठकीला अनुपस्थित असलेले आमदार राम शिंदे, आमदार विजय औटी, माजी खासदार दादा शेळके, माजी आमदार दादा कळमकर यांनी बैठकीला उपस्थिती लावत विभाजनाला पाठिंबा दिला. आमदार शिंदे म्हणाले, उत्तर विभागाच्या जिल्ह्याचे केंद्र कुठे करायचे याच्याशी दक्षिणेतील लोकांना देणे-घेणे नाही. विभाजनाच्या चळवळीला राजकीय वास येऊ नये, याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी देशमुख यांना केली. एक जानेवारी ही अंतिम मुदत गृहित धरून लढय़ाचे स्वरूप ठरवण्याची सूचनाही त्यांनी केली. विभाजनामुळे फटका बसणार्‍या जिल्हा परिषदेसारख्या यंत्रणांनी तातडीने विभाजनाचा ठराव संमत करण्याची सूचनाही त्यांनी मांडली. आमदार औटी म्हणाले, इच्छाशक्ती असल्यास सरकार काहीही करू शकते. विभाजनाचा विषय मुद्दाम वादाचा करण्यात आला आहे. अण्णांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात उतरण्याची परवानगी र्शेष्ठींकडून मिळणार आहे का? याचाही काहींनी विचार करण्याची आवश्यकता आहे. जबाबदार्‍या निश्चित करण्यासोबतच काही बाबींची गोपनीयता बाळगण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. विभाजनाचे रान पेटवून देऊन राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न व्हायला नको. कालबद्ध कार्यक्रम ठरवून त्यानंतर या विषयाला कोणीही हात घालू नये. विभाजनाचे राजकीय र्शेय कुणालाही मिळू नये, अशी मागणीही आमदार औटी यांनी केली.

प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले. विभाजनाच्या मागणीला सामान्य नागरिकांकडून पाठिंबा मिळत आहे. या बळावर प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली. तसेच तालुकास्तरावर समितीच्या बैठका घेऊन जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. समितीचे निमंत्रक विनायक देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विभाजनाचा ठराव घेण्याची सूचना मांडली. अण्णा हजारे यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याचे प्रयत्न सुरू असून यासाठी सर्वपक्षीय पाठबळाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यास सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. दक्षिणेतील प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय समिती स्थापन करून जनजागृती करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत शिर्डी हे जिल्ह्याचे केंद्र बनवून विभाजनाच्या खर्चासाठी लागणारा 250 ते 300 कोटींचा प्रश्‍न सोडवता येणार असल्याची सूचना केल्याचे देशमुख म्हणाले. यासाठी साई संस्थानकडून यासाठी मदत मिळू शकते. पालकमंत्री मधुकर पिचड व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विभाजनाला पाठिंबा दिला आहे, तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचाही पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. दादा कळमकर, डी. एम. कांबळे, वसंत लोढा, संजीव भोर, राजेश परकाळे, उबेद शेख, संजय झिंजे, अँड. शारदा लगड, डॉ. रावसाहेब अनभुले, सुभाष लांडे आदींनी चर्चेत भाग घेतला.

उत्तरेतील नेत्यांना मान
उत्तरेतील नेत्यांची हुजरेगिरी करण्यात दक्षिणेतील नेत्यांनी आतापर्यंत धन्यता मानली आहे. दक्षिणेतील नेता आला, तरी उठून मान देण्याचे सौजन्य मिळत नाही. मात्र, उत्तरेतील नेत्यांसाठी पायघड्या घातल्या जातात, असे दादा पाटील शेळके बोलत असतानाच माजी खासदार बाळासाहेब विखे विर्शामगृहावर आले. उबेद शेख, विनायक देशमुख हे त्यांच्या स्वागतासाठी धावले. शेळके यांच्या बोलण्याची प्रचिती याच बैठकीत आली.

भावनाविवश होऊ नका
जिल्हा विभाजनाच्या विषयावर दोन मंत्री बोलले, तर एक मंत्री अजूनही बोललेले नाहीत. दोन मंत्री विभाजनाच्या बाजूने बोलले म्हणून दक्षिणेतील लोकांनी भावनाविवश होऊ नये. मुख्यमंत्र्यांनी 2004 मध्ये विभाजनाचा निर्णय जाहीर केल्यानंतर दुसर्‍या दिवशी अधिसूचना निघायला हवी होती. त्यानंतर सर्वांचीच आळीमिळी गूपचिळी झाली. हा इतिहास दक्षिणेतील लोकांनी विसरूनये, असे आमदार औटी बैठकीत म्हणाले.