आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नगर - ज्या फळबागांना रात्रीचा दिवस करून पाणी दिले, ज्यांच्या उत्पन्नाच्या आशेवर मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्नाचे नियोजन केले, तोच आधारवड दुष्काळाच्या भक्ष्यस्थानी पडण्याची चिन्हे दिसत आहेत. पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केलेल्या या फळबागांना वाचविण्यासाठी आता नगर जिल्ह्यातील शेतकरी कर्ज काढून टॅँकरच्या पाण्याचा वापर करत आहे.
नगर तालुक्यातील शेतक-यांनी 3 हजार 614 हेक्टरवर फळबागांची लागवड केली आहे. त्यापैकी तब्बल 1 हजार 500 हेक्टरवर संत्रा, तर उर्वरित क्षेत्रावर डाळिंब, सीताफळ, आंबा, पेरू आदी फळबागांचा समावेश आहे. कोणत्याही फळबागेची लागवड केल्यानंतर किमान 4 ते 5 वर्षांनी उत्पन्नाला सुरुवात होते. तोपर्यंत खत, आंतरमशागत, फवारणी आदींचा खर्च शेतक-याला करावा लागतो. या फळबागांच्या उत्पन्नावर शेतक-यांच्या भविष्याची सर्व भिस्त अवलंबून असते.
यंदा भीषण दुष्काळामुळे नगर तालुक्यातील फळबागधारक शेतक-यांची स्वप्ने विस्कटण्याच्या स्थितीत आहेत. जिथे प्यायलाच पाणी नाही तिथे फळबागांना कोठून देणार? असा प्रश्न आहे. अशाही स्थितीत शेतकरी टँकरच्या सहाय्याने फळबागा जगवत आहेत. नगर तालुक्यातील पिंपळगाव उजनी, खडकी, पिंपळगाव माळवी परिसरात संत्र्यांच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. खडकी परिसरातील शेतकरी सिना नदी परिसरातील विहिरीवरून, तर पिंपळगाव परिसरातील शेतकरी वसंत टेकडी भागातून पाणी नेत आहेत. 12 ते 15 हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरसाठी शेतक-यांना तब्बल 1500 रुपये मोजावे लागत आहेत. 100 झाडांना दिवसाला एक टँकर पाणी लागते. खडकीतील फळबागांना दिवसाला 500 ते 600 टँकर, तर पिंपळगावमधील बागांना 800 टँकरने पाणी दिले जात आहे. अजून साडेतीन महिने टँकरनेच पाणी द्यावे लागणार आहे.
हेक्टरी 30 हजार अनुदान
दुष्काळात शेतक-यांना फळबागा जगवण्यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले आहे. फळबागांसाठी हेक्टरी 30 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठीचे फॉर्म भरण्यासाठी कृषी सहायक, मंडल अधिकारी शेतक-यांना मार्गदर्शन करत आहेत. लाभार्थींना 30 मार्चपर्यंत पहिला हप्ता हेक्टरी 15 हजार रुपये देण्यात येईल. ’’
रामदास दरेकर, तालुका कृषी अधिकारी, नगर.
टँकरसाठी कर्ज काढले
माझ्या शेतात 300 संत्र्यांची झाडे आहेत. पाच वर्षांपूर्वी या झाडांची लागवड केली असून अद्याप उत्पन्न हाती आलेले नाही. यावर्षी पाऊस झाला असता, तर उत्पादन मिळाले असते. आतापर्यंत जपलेली झाडे सोडून दिली, तर सर्व कष्ट वाया जातील. पुढील वर्षी चांगला पाऊस होईल, या आशेवर कर्ज काढून टँकरने बागेला पाणी देत आहे.’’
भारत निकम, शेतकरी, खडकी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.