आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar District Food Supply Officers Transfer Issue

कासारांवरील कारवाईने काळाबाजार थांबेल का ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हापुरवठा अधिकारी सोपान कासार यांच्यावर कारवाई झालेली असताना त्यांच्या बचावासाठी महसूल यंत्रणा पुढे आली आहे. कारवाई झालेली नाही, तर त्यांनी दिलेल्या बदलीच्या अर्जामुळे बदली झाल्याचा बचाव केला जात आहे.
मात्र, बदली झाली, तर त्यांना पुढचे नियुक्तीचे ठिकाण का देण्यात आले नाही? साडेपाच वाजता फॅक्स आल्यावर लगेच साडेसात वाजता त्यांना तातडीने पदमुक्त का करण्यात आले, या प्रश्नांची उत्तरे मात्र कासार यांच्या बचावासाठी पुढे आलेल्यांकडे नाहीत. या संदर्भात आलेल्या फॅक्सची प्रत जिल्हा प्रशासन देत नाही. अर्थात या कारवाईने स्वस्त धान्याचा काळाबाजार यंत्रणेतील गैरव्यवहार थांबणार का, हा प्रश्न आहे.
विनंतीवरून किंवा प्रशासकीय बदली, एवढीच या विषयाची व्याप्ती नाही. सार्वजनिक धान्य वितरण यंत्रणा पूर्णपणे गैरव्यवहारांमुळे किडलेली आहे. तिचा फटका सामान्यांना बसत आहे. शिवाय सरकारच्या धोरणांनाही हरताळ फासला जात आहे. सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कासार यांच्यावरील कारवाईला सामान्य विनंती बदलीचा रंग दिला जात आहे. मात्र, ते तसे नाही. कासार यांच्या कारभाराचा फटका स्वस्त धान्य वितरणाला बसत होता.
धान्य वाहतूक ठेकेदाराच्या मनमानीला ते चाप लावू शकले नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज होते. याशिवाय या यंत्रणेचे संगणकीकरण करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या उद्योगांमुळे या यंत्रणेला प्रचंड झळ बसली. तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा त्यांच्यावर आरोप होत होता. स्वस्त धान्य दुकानदारांची संघटना या विरोधात वारंवार अर्ज करत होती. मात्र, हितसंबंधांमुळे त्याकडे डोळेझाक करण्यात आली. कासार यांच्या काळात धान्य माफिया निर्माण झाले. त्यांच्या संपत्तीची चौकशी झाल्यास सर्व प्रकार उघड होणार आहेत. मात्र, त्यासाठी प्रशासनाकडे इच्छाशक्तीची गरज असल्याचे एका स्वस्त धान्य दुकानदाराने सांगितले.

धान्याचा गैरव्यवहार दडपला

स्वस्त धान्याचा गैरव्यवहार करणारी साखळीच कार्यरत आहे. तिची सुरुवात गोदामापासून होते. ‘दिव्य मराठी’ने (११ सप्टेंबर २०१४) ही यंत्रणा या प्रणालीतील धान्य वितरणातून धान्य कसे काढते, हे पुराव्यानिशी ‘दर महिन्याला २५ ट्रक धान्याची लूट’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. धान्याच्या गोदामातच तागाच्या पोत्यासह धान्याचे कसे वजन केले जाते, यातून महिन्याला अनेक टन धान्याला कशी गळती लागते, हे उघड केले होते. आजही तशाच पद्धतीने धान्याचे वजन केले जाते. जिल्हाधिकाऱ्यानी १५ सप्टेंबर २०१४ रोजी जिल्ह्यातील सर्व १८ गोदामांच्या अचानक तपासणीचे आदेश दिले.
या आदेशाला ‘चुना लावत’ कासार यांनी फक्त जामखेड श्रीगोंदे तालुक्यातील दोन गोदामांची तपासणी केली. दोन्ही गोदामांमध्ये दोष आढळून आला. त्यावेळी फक्त गोदामपालांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यापलीकडे कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर मात्र हे प्रकरण दडपण्यात आले. यात मलिदा मिळणाऱ्यांची यंत्रणा मोठी ताकदवर असल्याने विशेष म्हणजे यावर याच कासार यांनी कारवाई केली नाही.

त्यावेळी त्यांनी निवडणुकीचे कारण पुढे करून ही तपासणी टाळली होती. त्यानंतर ‘दिव्य मराठी’ने ‘जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर’ हे वृत्तही प्रसिद्ध केले होते. मात्र, जिल्हा पुरवठा विभागाची यंत्रणा इतकी सडलेली निर्ढावलेली असल्याने हा धान्य गैरव्यवहार दडपण्यात आला. गैरव्यवहारात हडपण्यात येणारे धान्य गरिबांच्या ताटात जाणारे आहे, तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

गजानन बाबर यांच्या तक्रारीवरून कारवाई?

माजी खासदार गजानन बाबर स्वस्त धान्य दुकानदारांच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी नगरला येऊन स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवठा विभागाकडून होणाऱ्या पिळवणुकीविरोधात बुधवारी (१५ एप्रिल) बैठक झाली. त्यानंतर बाबर यांनी एक निवेदन कासार यांना दिले. त्यावेळी बाबर यांना चांगली वागणूक मिळाली नाही. त्या दिवशीच बाबर यांनी थेट मंत्रालयात तक्रार केल्याने कासार यांच्यावर तडकाफडकी कारवाई झाल्याची जोरदार चर्चा आहे.
फोटो - "दिव्य मराठी' ने ११ सप्टेंबर २०१४ रोजी प्रकाशित केलेले वृत्त.