आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहून गेलेले मृतदेह शोधण्यात नौदलाला अपयश, शिवडोह फोडण्याची तयारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - अळकुटी रस्त्यावरील वडझिरे शिवारात शिवडोह तलावाजवळील पुलावरून ओमनी व्हॅनसह वाहून गेलेल्या तीन युवकांचे मृतदेह शोधण्यात नौदलाच्या तुकडीला अपयश आले. त्यामुळे तलावाचा सांडवा फोडून मृतदेह शोधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. गुरुवारी सायंकाळी अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली.

नगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शुक्रवारी तीन तास मृतदेहाच्या शोधासाठी प्रयत्न केले. ठाकर समाजाचे पाच तरुणही त्यावेळी तलावात शोध घेत होते. त्यांना अपयश आल्यावर नौदलाच्या जवानांनीही प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यांनाही अपयश आल्याचे पाहून सांडवा फोडून तलाव रिकामा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तलाव रिकामा करण्यास वडझिरे ग्रामस्थांचा विरोध होता. मात्र, जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, रामदास भोसले, शिवाजी औटी, बाळासाहेब दिघे यांनी ग्रामस्थांचे मन वळवले.

गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शिवडोह तलावाजवळील पुलावरून व्हॅनसह अवधूत परंडवाल (24, अळकुटी), सुदर्शन आवारी (23, रांधे), बाळू मुरगन (29, अत्तूर, तामिळनाडू) तिघे वाहून गेले. दुर्घटना घडून सतरा तास उलटल्यानंतरही युवकांचे मृतदेह शोधण्यासाठी सरकारी यंत्रणेकडून हालचाल होत नसल्यामुळे उपस्थित नागरिकांचा संयम सुटला. त्यामुळे घटनास्थळी रास्ता रोको करण्याचा निर्णय लोकांनी घेतला. मात्र, आमदार विजय औटी, बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते, वसंत चेडे, वडझिरेचे माजी सरपंच बाळासाहेब दिघे आदींनी जमावाला संयम राखण्याचे आवाहन केले. त्यामुळे रास्ता रोको स्थगित करण्यात आला. दुर्घटनेनंतर तब्बल 19 तासांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी होडीच्या साहाय्याने युवकांचा मृतदेह शोध सुरू केला. या जवानांनी तलावाला तीन फेर्‍या मारल्या. या जवानांनी, तसेच ठाकर समाजाच्या पाच तरुणांनी संपूर्ण तलाव पिंजून काढला. मात्र, त्यांचे प्रयत्न असफल ठरले. दरम्यान, तरुणांचे मृतदेह शोधण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी पाचारण केलेली नौदलाच्या 52 जवानांची तुकडी दोन वाजता घटनास्थळी पोहोचली.

अधिकारी, पदाधिकारी घटनास्थळावर तळ ठोकून
उपविभागीय दंडाधिकारी महेश पाटील, उपविभागीय पोलिस विभागीय अधिकारी श्याम घुगे, तहसीलदार जयसिंग वळवी, पोलिस निरीक्षक सुनील शिवरकर शुक्रवारी सकाळपासूनच घटनास्थळी ठाण मांडून होते. पोलिसांची तुकडीही घटनास्थळी तैनात करण्यात आली होती.