आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी चांगदेव ढेपले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी कोपरगाव तालुक्यातील चांगदेव बबनराव ढेपले यांची, तर उपाध्यक्षपदी जामखेडचे नारायण माणिक राऊत यांची रविवारी निवड झाली. प्रत्यक्ष मतदान घेण्याची वेळ आल्यामुळे सदिच्छा मंडळातील फूट पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. याच मंडळातील खांदवे गटाचा विजय झाला.

अध्यक्षपदासाठी ढेपले यांच्या नावाची सूचना गोकुळ कळमकर यांनी मांडली. त्याला नवनाथ तोडमल यांनी अनुमोदन दिले. त्यांच्याविरोधात विनोद फलके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. फलके यांच्या नावाची सूचना पांडुरंग काळे यांनी मांडली, तर अनुमोदन संतोष गायकवाड यांनी दिले. उपाध्यक्षपदासाठी राऊत यांच्या नावाची सूचना संतोष दळे यांनी मांडली, तर अनुमोदन प्रतिभा साठे यांनी दिले.

अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाल्यामुळे मतदान घ्यावे लागले. अध्यक्षपदासाठी ढेपले यांना 11, तर फलके यांना 9 मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी राऊत यांना 11 मते मिळून ते विजयी झाले.

ज्येष्ठ नेते विष्णू खांदवे, माजी अध्यक्ष गोकुळ कळमकर, नवनाथ तोडमल, दत्तात्रेय राळेभात, उद्धव मरकड, गोरख वाघमोडे आदी या वेळी उपस्थित होते. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कळमकर व खांदवे यांनी आटापिटा केला होता, पण त्यात त्यांना यश आले नाही.

संचालकांपैकी सत्ताधारी गटाचे 13, तर सदिच्छा मंडळाचे 7 संचालक होते. मात्र, नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सदिच्छा मंडळाकडे गेलेले सातही संचालक पुन्हा सत्ताधारी गटास जाऊन मिळाले. त्यामुळे सत्ताधार्‍यांचे संख्याबळ 20 झाले. मात्र, दोन दिवसांपूर्वीच सत्ताधारी गटातील पुन्हा सात संचालक सदिच्छा मंडळास जाऊन मिळाले. बँकेचे माजी अध्यक्ष गहिनीनाथ शिरसाट व विनोद फलके सदिच्छा मंडळाला जाऊन मिळाल्यामुळे सदिच्छाकडे 9 संचालक झाले. संगमनेरचे दोन संचालकही सदिच्छा मंडळाच्या संपर्कात होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी सत्ताधारी गटात राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे सदिच्छा मंडळाकडे केवळ 9 संचालक उरले.

ज्या संचालकांना सदिच्छाने जन्म दिला, त्याच संचालकांनी बंडखोरी केली. अर्थशक्तीचा मारा झाल्यामुळे सदिच्छा मंडळाचा पराभव झाला अन् बंडखोर गटाचा विजय झाला. सभासदांच्या हितासाठी आम्ही बँकेतील गैरकारभाराला विरोध करू, असे जिल्हा शिक्षक संघटनेचे सरचिटणीस बापू तांदळे यांनी सांगितले.

निवडीनंतर सर्मथकांनी मोठा जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला. फटाके फोडण्यात आले.

आम्हीच सदिच्छाचेच..
आम्ही सदिच्छा मंडळाचेच आहोत. निवड बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही पुढाकार घेतला होता. एकविचाराने उमेदवार ठरवला असता तर फूट चव्हाट्यावर आली नसती. आम्ही अर्थशक्तीचा वापर केला असता तर आमचे दोन संचालक फुटून त्यांच्याकडे गेलेच नसते. उलट त्यांनीच आमच्या संगमनेरच्या दोन संचालकांना आमिष दाखवले. पण त्यांनी त्याला झुगारून खांदवे गटाचे नेतृत्व मान्य केल्यामुळेच हा विजय झाला. ’’ गोकुळ कळमकर, माजी अध्यक्ष, शिक्षक बँक