आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंगमनेर - गेल्या वर्षी दुष्काळात तालुक्यासाठी शासनाकडून मिळालेल्या 14 कोटींच्या निधीतून 61 साखळी पद्धतीच्या सिमेंट बंधार्यांची कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी 54 बंधार्यांची कामे पूर्ण झाली असून यावर्षीच्या पावसाळ्यात त्यात पाणी साठणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सुमारे आठशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.
राज्यात गतवर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीनंतर राज्यातील 15 तालुक्यांतील पाणीपातळी दोन मीटरपेक्षा जास्त खोल गेल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या पाहणीत आढळून आले होते. या परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राज्यातील 15 टंचाईग्रस्त तालुक्यांसाठी 150 कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. या मदतीतून साखळी पद्धतीने सिमेंट बंधारे बाधण्याचे सरकारने आदेश दिले होते. नगर जिल्ह्यात अतिटंचाईग्रस्त असलेल्या संगमनेर व पारनेर या दोन तालुक्यांचा यात समावेश होता. संगमनेरसाठी 14 कोटी 11 लाख रुपयांची मदत सरकारने दिली.
या मदतीतून तालुक्यातील 61 ठिकाणी सिमेंट बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यात पूर्वीची जुनी कामे विचारात घेऊन त्याच्या खाली व वरच्या भागात स्थान निश्चित करून साखळी बांध बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापैकी 54 कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत.
अशी वाढेल पाणीपातळी
पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी या बंधार्यात अडवण्यात येणार आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढेल. संगमनेर तालुक्यात करण्यात आलेल्या या बंधार्यांमुळे जवळपास 2902 सहस्त्र घनमीटर पाणीसाठा होईल. त्यामुळे 814 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. याचा फायदा बंधार्याच्या परिसरातील शेतकर्यांना होणार आहे.
74 गावांत झाले सर्वेक्षण
संगमनेर तालुक्यात बांधण्यात येणार्या बंधार्यांसाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजूर केलेल्या 74 गावांत लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी सर्वेक्षण केले. त्यापैकी 32 गावे तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे समोर आल्याने तेथे 61 कामे प्रस्तावित करण्यात आली. यापैकी सध्या 54 कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
महसूलमंत्र्यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण
संगमनेर तालुक्यात बांधलेल्या 54 सिमेंट नाला बंधार्यांचा लोकार्पण सोहळा चिंचोली गुरव येथे रविवारी (9 जून) होणार आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता हा सोहळा होत आहे. पालकमंत्री बबनराव पाचपुते, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार मधुकर पिचड, आमदार डॉ.सुधीर तांबे, जिल्हाधिकारी संजीवकुमार आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. इतर बंधार्यांचेही लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमस्थळीच केले जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.