नगर - जिल्हा विभाजनाच्या वादात नगर दक्षिणेचा विकास रखडला आहे. मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय डावपेचात सर्वसामान्य जनतेचे हित भरडले जात आहे, याकडे लक्ष वेधणारे निवेदन कर्जत येथील प्राचार्य दिनेश रोडे यांनी मुख्यमंत्री व अन्य नेत्यांना पाठवले आहे.
निवेदनात म्हटले आहे, मागील अनेक वर्षांपासून जिल्हा विभाजनाचे गुऱ्हाळ सुरू आहे. मात्र, त्यातून काहीच साध्य होत नाही. उलट विकासकामांकडे दुर्लक्ष होत आहे. नव्या जिल्ह्याचे मुख्यालय कोठे करायचे, यावरून काहीजण हटवादी भूमिका घेत राजकीय डावपेच खेळत आहेत. या वादात नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागाचा विकास खुंटला आहे. राजकीय मंडळींच्या बेफिकिरीमुळे संपूर्ण जिल्हाच एकप्रकारे वेठीस धरला गेला आहे.
नगर जिल्ह्याची अवस्था ना घरका, ना घाटका अशी झाली आहे. न्यायालयीन बाबतीत हा जिल्हा औरंगाबादला, महसूलसाठी नाशिकला, तर शिक्षणाच्या बाबतीत पुण्याला जोडला गेला आहे. नगरचे हक्काचे असलेले गोदावरीचे पाणी मराठवाड्यात, तर कुकडीचे पाणी पुणे जिल्ह्यात चालले आहे. राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे कर्जतचा उत्तर-पूर्व भाग, पूर्ण जामखेड, श्रीगोंद्याचा पूर्व व उत्तर भाग, पारनेरचा नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक भाग, पूर्ण नगर तालुका, तसेच वांबोरी चारी वगळता पाथर्डी तालुका कायम अवर्षणग्रस्त राहिला आहे. शेवगावलाही जायकवाडीचा फारसा फायदा अजून मिळालेला नाही. सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी नेते विभाजनाच्या चर्चेत मग्न आहेत. जिल्हा विभाजनाचा प्रश्न रेंगाळत ठेवणा-यांनी यासंदर्भात कधी तोंड उघडले का, असा प्रश्न रोडे यांनी विचारला आहे.
खताळ, थोरात, कोल्हे, विखे ही नेतेमंडळी महसूल, गृह, कृषी, पाटबंधारे, परिवहन, शिक्षण अशा महत्त्वाची खाती सांभाळत असताना जिल्हा विभाजनाचा प्रश्न सोडवू शकली नाहीत. दक्षिणेतील पाचपुते, गांधी, राठोड, ढाकणे, निंबाळकर, भारस्कर यांनीही विभाजनाबाबत आग्रही भूमिका पूर्वी घेतली नाही. त्यामुळे हा प्रश्न भिजत पडला आहे. त्यात सामान्यांचीच फरपट होत आहे.
कर्जतला अद्याप स्वतंत्र एसटी आगार होऊ शकले नाही. मंजुरी मिळाल्यानंतरही याबाबत कार्यवाही होऊ शकलेली नाही. जामखेड, श्रीगोंद्यात एमआयडीसी नाही. जामखेडचे क्षेत्र अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. पाथर्डी, शेवगावचे तेच रडगाणे आहे. पाटपाण्याच्या सुविधेसाठी जामखेड व कर्जत तालुका तडफडत असताना खुर्चीला चिकटून राहण्यासाठी कुकडी व उजनीचे पाणी जामखेड, कर्जतला मिळू न देता सोलापूर व लातूरला लाभ दिला गेला.
अनेक महत्त्वाची ऐतिहासिक व धार्मिक स्थळे असूनही जिल्ह्याचा पर्यटन विकास रखडला आहे. नव्या पालकमंत्र्यांनीही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. रस्ते, तसेच रेल्वेमार्गाचा विस्तार ठप्प आहे. नगरहून बीड, परळीकडे जाणारा रेल्वेमार्ग डोंगराचे कारण देत आष्टीहून वळवण्यात आला. डोंगराची अडचण कोकण रेल्वेला का आली नाही? केवळ नेत्यांच्या दुर्लक्षामुळे हे घडत आहे, असे रोडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
स्वार्थासाठी अस्मिता गहाण
दक्षिणेतील कारभा-यांनी
आपली अस्मिता आपल्या स्वार्थासाठी कुठेतरी समर्पित केली असावी. त्यामुळेच जनतेची दिशाभूल करत नगर जिल्हा विभाजनाची कार्यवाही होऊ दिली जात नाही. हा प्रश्न असाच आणखी तीन-चार पिढ्या रेंगाळत ठेवण्याची नेत्यांची व्यूहनिती आहे, असे प्राचार्य रोडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.