आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांसाठी लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी; नगरमध्ये पतंगरावांच्या तैनातीत प्रशासन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- टंचाई आढावा बैठक घेण्यासाठी नगरमध्ये आलेले मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांच्या दौ-यासाठी एकाच दिवसात लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला आहे. पोलिस परेड मैदानावर कदम यांचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर पाच हजार लिटरचे सुमारे 41 टँकर रिकामे करण्यात आले. त्यामुळे टंचाईचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मंत्रिमहोदयांना पाणी टंचाईचे कितपत गांभीर्य आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कदम यांच्या दौ-यासाठी जिल्हा प्रशासन दोन दिवसांपासूनच तयारीला लागले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरण, बांधकाम, पाटबंधारे, जीवन प्राधिकरण असे सर्वच विभाग कामाला लागले होते. त्यात बांधकाम विभागाकडे मंत्रिमहोदयांसाठी हेलिपॅड तयार करण्याची जबाबदारी होती. पोलिस परेड मैदानावर हे हेलिपॅड तयार करण्यात आले, परंतु हेलिकॉप्टर उतरल्यानंतर धूळ उडू नये, यासाठी मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. बांधकाम विभागाने एका खासगी ठेकेदारामार्फत हे काम करून घेतले. ठेकेदारानेही शुक्रवारपासूनच पाणी सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे ऐन दुष्काळात मैदानावर एवढे पाणी कशासाठी सोडण्यात येत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पाण्याच्या या उधळपट्टीबाबत मात्र ‘दिव्य मराठी’ दोन दिवसांपासून लक्ष ठेवून होते.
दोन दिवसात मैदानावर तब्बल एक लाख लिटर पाणी सोडण्यात आले. त्यामुळे मैदानावर अक्षरश: चिखल झाला होता. त्यामुळे टंचाईचा आढावा घेण्यासाठी येत असलेल्या मंत्रिमहोदयांना पाण्याची उधळपट्टी दिसत नाही का, अशी कुजबुज नागरिकांमध्ये सुरू होती. एकीकडे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना मैलोन्मैल पायपीट करावी लागते, तसेच एखाद्या खेडेगावात एक टँकर वाढून मिळावा, यासाठी ग्रामस्थांना जिल्हा प्रशासनाकडे चकरा माराव्या लागतात. हेलिपॅडसाठी मात्र एकाच दिवसात एक लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी करण्यात आली. ऐन दुष्काळात मंत्र्यांचे दौरे किती महागाचे ठरू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

संख्या गुलदस्त्यात- वनमंत्री पतंगराव कदम यांच्या दौ-यानिमित्त हेलिपॅड तयार करणे महत्त्वाचे होते. त्यासाठी खासगी ठेकेदारामार्फत पोलिस परेड मैदानावर पाणी सोडण्यात आले. परंतु ठेकेदाराने नक्की किती टँकर सोडले हे माहिती नाही, पण 4 ते 5 टँकर सोडण्यात आले असतील.’’ अनिल लाटणे, उपअभियंता, बांधकाम विभाग.

उधळपट्टी उघड- मंत्र्यांच्या दौ-यानिमित्त होत असलेल्या पाण्याच्या उधळपट्टीबाबत ‘दिव्य मराठी’ ने मैदानाच्या आजूबाजूला असलेले व्यावसायिक, नागरिक, तसेच काही पोलिसांना विचारले असता सुमारे 41 टँकर मैदानावर रिकामे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, ठेकेदाराशीही संपर्क करण्यात आला असता पाण्याची उधळपट्टी समोर आली.