आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आपला माणूस’ विखेंचा झाल्याने अडचण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शिर्डी मतदारसंघातील शिवसेना खासदार व सध्या कॉँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांचे गेल्यावेळच्या निवडणुकीत ‘आपला माणूस आपल्यासाठी’ हे घोषवाक्य होते. त्या वेळी त्यांच्या विजयात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांची मोठी भूमिका होती. आता त्यांच्यावर ‘विखेंचा माणूस’ असा शिक्का बसल्याने विखेंचे विरोधक वाकचौरेंच्या विरोधात सक्रिय झाल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, बबनराव घोलपांची उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की आल्यानंतर शिवसेनेने सदाशिव लोखंडेंना उमेदवारी दिली. वाकचौरेंना आघाडीतून होणारा विरोध लोखंडेंच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.

वाकचौरे खरे तर मूळचे कॉँग्रेसचेच, मात्र गेल्या वेळी विखेंनी त्यांना शिवसेनेत पाठवून निवडून आणले. त्यामुळे ते कायम कॉँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असत. निवडणुकीच्या तोंडावर वाकचौरेंनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करताच युतीच्या कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली. विखेविरोधी काँग्रेसच्या इतर गटांनाही त्यांना स्वीकारले नाही. वाकचौरेंच्या विरोधात संताप अद्यापही इतका तीव्र आहे की, अनेक ठिकाणी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे बरोबर असतानाही लोकांनी त्यांच्या सभा होऊ दिल्या नाहीत. संगमनेर व नेवासे तालुक्यात तर त्यांच्यावर अंडी फेकण्याचाही प्रयत्न झाला. संगमनेरमध्ये तर मारहाणही झाली.

सुरुवातीला लोखंडे यांच्या उमेदवारीकडे राजकीय नेत्यांनी गांभीर्याने पाहिले नव्हते. लोखंडे यांनी मतदारसंघ नवीन असल्याने तो पिंजून काढला. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर भर दिला. वाकचौरेंवरील रागामुळे महायुतीचे नेते व कार्यकर्ते लोखंडेंसाठी झटून काम करत आहेत. त्यांच्या दिमतीला शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांची नियोजनबद्ध अशी कार्यकर्त्यांची फौज आहे. गेल्या वेळी वाकचौरेंच्या विजयात गाडे यांचा मोठा वाटा होता. या मतदारसंघाला लोखंडे नवीन असले, तरी ते मूळचे नगर जिल्ह्यातीलच आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघात सलग 15 वर्षे ते आमदार होते. शिर्डीच्या अलीकडील कोल्हार हे त्यांचे सासर. त्याच विखे विरोधकांचीही त्यांना मोठी मदत होत आहे. प्रस्थापितांविरोधात नाराजी व मोदी लाट या दोन्हीचा लोखंडेंना फायदा होऊ शकतो.

गटा-तटाचा बसणार फटका
नेवाशात राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख आमदार आहेत, तेथे शिवसेनेचे वर्चस्वही मोठे आहे. श्रीरामपुरात काँग्रेसचे आमदार आहेत. मात्र, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व वाकचौरे यांचे फारसे जमत नाही. शहरात काँग्रेसचे वर्चस्व असले, तरी ग्रामीण भागात विखेंचे विरोधक भानुदास मुरकुटे यांची पकड आहे. संगमनेरमध्ये थोरात, अकोल्यात राष्ट्रवादी, तर कोपरगावात शिवसेनेचे बर्‍यापैकी वर्चस्व आहे. मधुकर पिचड वाकचौरेंच्या पाठीशी आहेत. नगरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांच्या मार्गात विखेंनी अडथळे उभे केल्याची चर्चा असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाकचौरेंना मनापासून मदत करताना दिसत नाहीत. त्यातच राजळे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे थोरातांचे वाकचौरेंना कितपत पाठबळ मिळेल, याबाबतही शंका व्यक्त होत आहे.

भाऊसाहेब वाकचौरे
बलस्थाने : विद्यमान खासदार. मूळचे अकोले तालुक्यातील असल्याने स्थानिक उमेदवार असल्याचा लाभ. विखेंची सर्व रसद मागे. शिर्डीत दीर्घकाळ वास्तव्य असल्याने सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध
उणिवा : गेल्या पाच वर्षांत लोकांची कामे न केल्याने नाराजी. विशेषत: मुस्लिम मतदारांची नाराजी भोवणार. गेल्या वेळी आठवलेंचा पराभव केल्याने दलित मते विरोधात. स्वत:च्या कार्यकर्त्यांचा अभाव.

सदाशिव लोखंडे
बलस्थाने : 15 वर्षे आमदार राहिल्याने निवडणुकांचा मोठा अनुभव. गैरव्यवहाराचे कोणतेही आरोप नाहीत. कार्यकर्ते जोडण्याचे जबरदस्त कौशल्य. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते प्रचारात. वाकचौरेंविरोधातील प्रचंड नाराजीचा व मोदी लाटेचा लाभ मिळणार.
उणिवा : मूळचे शिर्डीबाहेरील असल्याची प्रतिमा. मतदारसंघच नवा असल्याने मतदारांशी संपर्क करण्यात अडचणी.

विखेंच्या जादूवर प्रश्नचिन्ह
नेवासे, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले अशा सहा तालुक्यांसह राहुरी तालुक्यातील 33 टक्के भाग असलेल्या या मतदारसंघात जातीय समीकरणे फारशी प्रभावी नाहीत. विखे विरुद्ध इतर असेच येथील राजकारण चालते. मुळात आता विखेंचा प्रभाव घटत आहे. गेल्या वेळी विधानसभेत राधाकृष्ण विखेंना शिर्डीत अत्यल्प मताधिक्य मिळाले. त्यामुळे विखेंचा पाठिंबा वाकचौरेंना कितपत फलदायी ठरतो, याबाबत शंकाच आहे. त्यातच गेल्या वेळचा रामदास आठवलेंचा पराभव दलित कार्यकर्ते विसरलेले नाहीत. त्यामुळे दलित मतदान एकगठ्ठा काँग्रेसला मिळेल, असेही छातीठोक सांगता येणार नाही.