आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी : सर्वत्र ग्रामपंचायतीसारखी चुरस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दहा दिवस राहिले असल्याने प्रचारासाठी उमेदवारांची धावाधाव सुरू आहे. महायुती आघाडी तुटल्याने जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत पंचरंगी, सप्तरंगी अशा लढती होत आहेत. त्यामुळे प्रत्येक मताला महत्त्व आले आहे. प्रथमच विधानसभा निवडणुकीत ग्रामपंचायत, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे चुरस निर्माण झाली आहे. हक्काचे मतदान करून घेण्यासाठी उमेदवार कामाला लागले आहेत. बाहेरगावी स्थलांतरित मतदारांना मतदानासाठी घेऊन येण्याचे खास नियोजन उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील बारा मतदारसंघांत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या चार प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसह १३८ जण निवडणूक रिंगणात आहेत. सर्वाधिक पंधरा उमेदवार श्रीगोंदे, कोपरगाव श्रीरामपूर मतदारसंघांत आहेत. त्या खालोखाल पारनेरमध्ये १४, तर सर्वांत कमी पाच उमेदवार अकोले मतदारसंघात आहेत. अन्य कोणत्याही निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक चुरस असते. गावपातळीवरील ही निवडणूक सर्वच उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची असते. आपल्या
वॉर्डातील मतदारांना मतदानाच्या दिवशी घराबाहेर काढण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागतात. इतकेच नव्हे, तर नोकरी अथवा कामानिमित्त बाहेरगावी राहत असलेल्या मतदारांना दोनशे ते पाचशे किलोमीटर लांबून आणण्याचे नियोजन करण्यात येते.

या मतदारांना आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपवण्यात येऊन त्यासाठी रसदही पुरवली जाते. नगरपालिका महापालिका निवडणुकीतही कमी-अधिक प्रमाणात असेच चित्र असते. चुरशीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सुमारे ९० ते ९८ टक्क्यांपर्यंत मतदानाची टक्केवारी जाते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा या निवडणुकीत अशी चुरस अाणि उत्साह उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्येही नसतो. याला अनेक कारणे आहेत. बऱ्याच वेळा उमेदवारच प्रत्येक गावात जाऊन मतदारांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरतात. विधानसभा लोकसभा मतदारसंघातील मतदारसंख्या मोठी असल्याने या निवडणुकीत कार्यकर्त्यांसह उमेदवारांतही उदासीनता असते.

उमेदवारांची संख्या अधिक असल्याने कोणताही धोका पत्करण्यास उमेदवार तयार नाहीत. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी प्रथमच सर्वच पक्षांचे उमेदवार आपले हक्काचे मात्र, कामानिमित्त बाहेरगावी गेलेले मतदार शोधत आहेत.