नगर - तालुक्यातील वारुळवाडी येथे जुन्या वादातून दोन गटांत शुक्रवारी (१ मे) रात्री मारामारी झाली. या वेळी गोळीबार झाल्याचाही प्रकार समोर आला आहे. त्यामुळे भिंगार कॅम्प पोलिसांनी परस्परविरोधी आलेल्या तक्रारींवरून सोळा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेतला आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली जात आहे.
दीपक आत्माराम दुसुंगे यांनी पहिली फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी किशोर, विशाल, युवराज, योगेश दुसुंगे, गोरख वारुळे, सागर कर्डिले, बापू दुसुंगे, विजय दुसुंगे (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारहाण, दंगल, भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. दुसरी फिर्याद किशोर कानिफनाथ वारुळे यांनी दिली. त्यावरून रामदास सूर्यभान वारुळे, संदीप रामदास वारुळे, अरुण वसंत वारुळे, अरुण महादेव खोमणे, नाना वसंत वारुळे, रुपेश आत्माराम दुसुंगे, दीपक दुसुंगे आदींविरुद्ध दंगल, जबरी चोरी, मारहाण, भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला.
या गुन्ह्याचा तपास भिंगार कॅम्प ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जी. पी. गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. दरम्यान, भिंगारमधील कायदा सुव्यवस्था मागील काही वर्षांपासून बिघडली असून पोलिस प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.