आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी परिस्थितीतही 15 लाख रोपे तयार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दुष्काळी परिस्थितीतही नगर वन विभागाने यंदा 15 लाख रोपे तयार केली आहेत. त्यातील एकट्या नगरच्या रोपवाटिकेत 3 लाख 10 हजार व नेवासे फाट्यावरच्या मुकिंदपूर रोपवाटिकेत 2 लाख अशी 5 लाख, 10 हजार रोपे तयार आहेत. औरंगाबाद रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालयाची मागील बाजू रोपवाटिकेने व्यापली असून सर्वत्र हिरवाईचे साम्राज्य पसरले आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांतील या हिरवाईला जमिनीवर येण्याची प्रतीक्षा आहे.

यंदा तीव्र दुष्काळी परिस्थितीतही रोपवाटिकेतील विहिरीला पाणी होते. उपवनसंरक्षक यू. जी. कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल रमेश देवखिळे यांनी वन कर्मचार्‍यांकडून 40 प्रकारची रोपे तयार करून घेतली. त्यासाठी विविध ठिकाणांहून बी मागवले. रोपांना लागणारे खत तयार करण्यासाठी कंपोष्ट खतही कार्यालयातच तयार केले जात आहे.

प्रभारी उपवनसंरक्षक शिवाजीराव फटांगरे यांनी वेळोवेळी रोपवाटिकेला भेट देऊन मार्गदर्शन केले. यंदा कडूनिंब, आंबा, वड, पिंपळ, फणस, उंबर, शिसू, सीताफळ, वावळा, अर्जुन सादडा, बहावा, करंज, बेल, जांभूळ, आवळा, हिरडा, बेहडा, तेटू, शिरस, पतंग, बिजा, आपटा, खैर, कांचन, भेंडी, बांबू आदी देशी झाडांबरोबरच गुलमोहोर, नीलमोहोर, काशीद, पेल्टोफोरम, रेन ट्री, अशोक या विदेशी झाडांची रोपे तयार करण्यात आली आहेत. यातील तेटू अतिशय दुर्मिळ आहे. ही रोपे किमान एक फुटापासून तीन फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहेत. वनरक्षक अफसर पठाण व त्यांच्या सहकार्‍यांनी अतिशय काळजीपूर्वक ही रोपे वाढवल्याने हा परिसर हिरवागार झाला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागाच्या कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. एक लाख रोपे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत 2 लाख 55 हजार रोपे नेवासे तालुक्यातील मुकिंदपूर, लोहगाव, राजेगाव, नगर तालुक्यातील जेऊर, विळद, देहरे बारदरी, गुंडेगाव येथील सर्व मिळून 240 हेक्टर वनक्षेत्रात लावण्यात येणार असल्याची माहिती देवखिळे यांनी दिली.

रोपवाटिका व रोपांची संख्या

नगर 3 लाख 10 हजार

मुकिंदपूर (ता. नेवासे) 2 लाख

बारागाव नांदूर (ता. राहुरी) 4 लाख

म्हैसगाव (ता. राहुरी) 1.5 लाख

बेलवंडी (ता. श्रीगोंदे) 1 लाख

देऊळगाव (ता. श्रीगोंदे) 50 हजार

मढी (ता. पाथर्डी) 2.5 लाख

पाथर्डी 1 लाख

प्रतिकूल परिस्थितीत यश
मोठय़ा प्रमाणावर रोपे तयार करणे, हे मोठे आव्हान होते. नगर वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वनक्षेत्रपाल व कर्मचार्‍यांनी अतिशय कष्टाने हे आव्हान पेलले. विशेषत: देशी झाडांची रोपे तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. नगर वन विभागाच्या क्षेत्रातील 17 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर ही रोपे लावण्यात येणार आहेत. वन विभागाने लावलेली झाडे जगण्याचे प्रमाण मोठे असल्याने जिल्ह्यात हिरवाई वाढत आहे.’’ यू. जी. कडलग, उपवनसंरक्षक, अहमदनगर विभाग.