आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या विकासातील अडसर होणार दूर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरच्या किल्ल्याचे दुर्दैवाचे दशावतार लवकरच संपतील अशी चिन्हे आहेत. केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी किल्ल्याला भेट देऊन लवकरच या कामातील तिढा दूर करून विकास आराखड्याला चालना देण्याचे आश्वासन दिले.

शुक्रवारी सकाळी नाईक यांनी ग्रामदैवत विशाल गणेश, आशियातील एकमेव असलेले रणगाडा संग्रहालय व भुईकोट किल्ल्याला पत्नी विजयासहभेट दिली. खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी अनिल कवडे, नगरसेवक सुवेंद्र गांधी त्यांच्यासमवेत होते. संग्रहालयातील सर्वांत जुने ‘सिल्व्हर घोष्ट’ हे चिलखती वाहन, भारतीय सैनिकांनी उद्ध्वस्त केलेला पाकिस्तानचा पॅटन, भारतीयांच्या शौर्याची गाथा सांगणारा विजयंता आदी रणगाडे पाहून हे संग्रहालय पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरेल, असे उद्गार नाईक यांनी काढले.

किल्ल्यातील दिवाणे आम, भुयारी मार्ग, बारूदखाना, तसेच नेता कक्षाला नाईक यांनी भेट दिली. किल्ल्याच्या विकासाचे काम संरक्षण मंत्रालयाच्या सामंजस्य करारासाठी रखडले आहे. याबाबत संबंधितांशी चर्चा करून लवकरच काम पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे नाईक यांनी सांगितले. खासदार गांधी, जिल्हाधिकारी कवडे, किल्ल्याचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल मुलतान सिंग, भूषण देशमुख यांच्याशी त्यांनी चर्चा केली. सरदार पटेलांसह राष्ट्रीय नेते या किल्ल्यात स्थानबद्ध होते. त्यामुळे हा किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यासंदर्भात पंतप्रधानांशीही बोलू, असे नाईक व गांधी यांनी सांगितले.

पर्यटनविकासासाठी नगरकरांचे साकडे
शहराच्या पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने भरीव तरतूद करावी, या मागणीचे निवेदन चित्रकार योगेश हराळे यांनी नगरकरांच्या वतीने मंत्री नाईक यांना दिले. या निवेदनाचा स्वीकार करताना नाईक म्हणाले, नगरमधील वास्तू फक्त बघण्यासाठी नसून त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.