आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकिल्ल्यांच्या पहिल्या यादीत नगरचा समावेश नाही...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सोनिया गांधींची इच्छा असूनही काँग्रेसच्या राजवटीत नगरच्या किल्ल्याचं भाग्य उजळलं नाही आणि आता नेहरूंचं महात्म्य वाढायला नको, म्हणून या किल्ल्याच्या जतनाकडे भाजपकडून दिरंगाई होत आहे. महापालिकेवर अधिराज्य गाजवणाऱ्या राष्ट्रवादीला तर आपल्या शहरातील या राष्ट्रीय स्मारकाचं काही देणं-घेणं नाही.

काँग्रेस आणि भाजपच्या सत्तासंघर्षात नगरच्या किल्ल्याचा विकास मागील पाच वर्षांपासून रखडला आहे. दिलीप वळसे अर्थमंत्री असताना त्यांनी स्वत: पुढाकार घेत या किल्ल्यासाठी ५३ कोटींचा भरीव निधी मंजूर केला, पण युती शासनाने नेमलेल्या गड संवर्धन समितीने ज्या किल्ल्यांच्या सर्वेक्षणाचे काम प्राधान्याने हाती घेण्याचे ठरवले आहे, त्यात नगरच्या किल्ल्याचं नावही नाही. काँग्रेस राष्ट्रवादीनेही त्यासंदर्भात आवाज उठवलेला नाही.

सांस्कृतिक खात्याचे मंत्री विनोद तावडे यांनी नेमलेल्या गड संवर्धन समितीच्या वतीने राज्याच्या सर्व महसुली भागात कार्यशाळा घेण्यात आल्या. या मालिकेतील शेवटची नाशिक विभागाची कार्यशाळा नुकतीच पार पडली. गड संवर्धन समितीचे सदस्य ज्येष्ठ इतिहास संशोधक प्र. के. घाणेकर, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. श्रीकांत घारपुरे, पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे संशोधन सहायक डॉ. सचिन जोशी, औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातील सहायक पुरातत्वविद्् तेजस गर्गे, नाशिक येथील दुर्गप्रेमी गिरीश टकले, ऋषिकेश यादव आदी या कार्यशाळेस उपस्थित होते.

दुर्ग संवर्धनाचे नियम, संकेत, पुरातन वास्तूंवरील झाडे काढणे, किल्ल्यांचे नकाशे रेखाटन, दुर्ग संवर्धनाबाबत वनविभागाचे नियम या विषयांवर कार्यशाळेत चर्चा झाली. महाराष्ट्रातील ज्या किल्ल्यांच्या सर्वेक्षणाची प्राथमिक यादी गड संवर्धन समितीने तयार केली आहे, त्यात नगर जिल्ह्यातील केवळ बहादूरगडाचा (ता. श्रीगोंदे) समावेश आहे. नगरचा किल्ला, तसेच अकोले तालुक्यातील गडांचा त्यात समावेश नाही. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा भाजपच्या एकाही लोकप्रतिनिधीने प्रयत्न केला नाही.

२२ नोव्हेंबरला काँग्रेस साजरी करणार जयंती
१४नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिन. जगभर हा दिवस "बालदिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काँग्रेसच्या वतीने मात्र १४ एेवजी २२ नोव्हेंबरला नगरच्या किल्ल्यात पंडितजींची १२५ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच किल्ल्याला भेट देऊन कार्यक्रमाबाबत चर्चा केली.

"पुरातत्व'ने आपली जबाबदारी झटकली
नगरचाभुईकोट किल्ला लष्कराच्या ताब्यात असला, तरी तो पर्यटकांना पाहण्यासाठी खुला आहे. तथापि, हा किल्ला लष्कराकडे असल्याचे कारण पुढे करून पुरातत्व विभागाने त्याची जबाबदारी घेण्याचे टाळले. त्यामुळे शासकीय पातळीवर गैरसमज निर्माण झाले असून किल्ल्याच्या सामंजस्य करारातही अडथळे आले आहेत. नगरच्या लोकप्रतिनिधींनी मुंबई दिल्लीत संबंधितांची भेट घेऊन यातून मार्ग काढणे आवश्यक आहे.