आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Fort Pictures Issue At Nagar, Divya Marathi

नगरच्या किल्ल्यात बंदिवासात असताना त्यांनी रेखाटली चित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - पहिले महायुद्ध सुरू झाले, त्याला येत्या 28 जुलै रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. पहिल्या (1914 ते 1919) व दुस-या महायुद्धात (1939 ते 1945) अनेक जर्मन युद्धबंद्यांना नगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात ठेवण्यात आले होते. त्यापैकी काही लेखक, कवी व चित्रकार होते. बंदिवासात असतानाही त्यांनी आपली कला कोमेजू दिली नव्हती.
नगरचा किल्ला हा भारतातील अभेद्य व अपराजित भुईकोटांपैकी एक मानला जातो. ब्रिटिश सेनापती जनरल आर्थर वेलस्लीने 1803 मध्ये हा किल्ला घेतल्यानंतर तशी नोंद केली होती. नंतरच्या काळात हा किल्ला म्हणजे ब्रिटिश लष्कराचे महत्त्वाचे ठाणेच बनला. सुरक्षा व्यवस्था मजबूत असल्याने कारागृह म्हणूनही किल्ला वापरला गेला.
पहिल्या महायुद्धाला जुलै 1914 मध्ये तोंड फुटल्यानंतर ऑगस्टमध्ये भारतात त्याचे पडसाद उमटू लागले. ब्रिटिशांनी आपल्या विरोधातील राष्ट्रांच्या नागरिकांची धरपकड करून त्यांना कैदेत टाकले. त्यातील काही जणांना नगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले. नगरचा कॅम्प दोन भागात विभागलेला होता. त्यांचा ताबा लष्कराकडे होता. नंतर तिसरा पॅरोल कॅम्प सुरू झाला, पण तो शासकीय अमलाखाली होता. 13 ऑगस्ट 1915 रोजी ब्रिटिश सरकारने प्रसृत केलेल्या पत्रकानुसार 1153 जर्मन आणि ऑस्ट्रियन लष्करी युद्धबंदी (ज्यात 452 सोल्जर, प्रामुख्याने नौसैनिक होते) व 1232 नागरिक, ज्यामध्ये 539 महिला व मिशनरी होते. ‘कॅम्प ए’साठी दोन बराकी होत्या, ज्यात एक हजारांहून अधिक जणांना डांबण्यात आले होते. त्यांना खाण्यासाठी पुरेसे अन्न नव्हते. तीनशे जणांत मिळून एक शौचालय होते. ‘बी कॅम्प’मध्ये डॉक्टर, व्यावसायिक व वरिष्ठ श्रेणीतील युद्धबंद्यांच्या समावेश होता. यातील काहींना पूर्व आफ्रिकेतून आणले गेले होते. दुस-या महायुद्धातही अनेक जर्मन युद्धबंदी नगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले होते.
युद्धबंद्यांपैकी काही जण लेखक, कवी व चित्रकार होते. त्यांनी किल्ल्यातील दैनंदिन जीवन तसेच त्यातील काही गमतीशीर प्रसंग चित्रबद्ध केले. काही जणांनी ब्रिटिश सोल्जर व अधिका-यांची व्यंगचित्रे काढली. यातील काही रेखाचित्रे नगर येथील बिली नगरवाला यांच्याकडे सध्या आहेत.
या युद्धबंद्यांवर अनेक बंधने लादण्यात आली होती. त्यांची पत्रे सेन्सॉर केली जात. यातील काही पत्रे जर्मन आणि ब्रिटिश अर्काइव्हजमध्ये जपून ठेवण्यात आली आहेत. सुटका झाल्यानंतर मायदेशी परतलेल्या काही जणांनी नगरच्या वास्तव्यातील आठवणी लिहून ठेवल्या. ही पत्रे आणि पुस्तके नगरच्या इतिहासाचा भाग बनली आहेत.
प्रदर्शनाचे नियोजन
महायुद्धांतील अनेक घडामोडींचा साक्षीदार नगरचा किल्ला आहे. पहिल्या महायुद्धाच्या शताब्दीनिमित्त नोव्हेंबरमध्ये नगरच्या किल्ल्यात प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्यासाठी लष्कराच्या एसीसी अँड एसच्या सहकार्याने जिल्हाधिकारी अनिल कवडे, ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर नियोजन करत आहेत. या प्रदर्शनासाठी पॅरिसस्थित डॉ. शशी धर्माधिकारी यांनी महत्त्वाच्या दस्तऐवजांचे संकलन केले आहे. फोरम ऑफ जर्मनी आणि महाराष्ट्र मंडळ फ्रान्स यांचेही सहकार्य प्रदर्शनाला मिळणार आहे.