आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाच्या खूनप्रकरणी 10 वष्रे सक्तमजुरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर । युवकाचा खून करुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दिनेश ऊर्फ पप्पू ज्ञानदेव अळकुटे (30, महावीर नगर, झोपडी कॅण्टीन, सावेडी) याला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. याच गुन्ह्यातील इतर चार आरोपींची मात्र सबळ पुराव्याअभावी निदरेष मुक्तता झाली. जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
या खटल्याची अधिक माहिती अशी - दिनेश अळकुटे याचा प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. 31 मार्च 2011 रोजी काही मित्रांसह त्याने अंबर हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या स्क्रीनवर भारत-पाकिस्तान क्रिकेटचा सामना पाहिला. नंतर ते सिव्हिल हडको परिसरात आले. तेथे गणेश दिंडे या युवकाशी किरकोळ कारणावरुन त्यांचे वाद झाले. या वादाचे पर्यावसान भांडणात व नंतर मारामारीत झाले. दिनेशने त्याच्याजवळ असलेल्या चॉपरने गणेशवर वार केले. त्याच्या मित्रांनी गणेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गणेशचा मृत्यू झाला. नंतर दिनेश व त्याचा मित्रांनी गणेशची मृतदेह कचराकुंडीत नेऊन टाकला व सर्वजण घरी जाऊन झोपले. काही वेळाने दिनेशने तोफखाना पोलिस ठाण्यात जाऊन घडलेली घटना पोलिसांना सांगितली.
दिनेशच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी त्याच्यासह मित्रांवर खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला. शहर विभागाचे उपअधीक्षक श्याम घुगे यांनी गुन्ह्याचा तपास करुन दिनेश अळकुटे, लक्ष्मण सूर्यभान शेळके (37), परशुराम किसन शेळके (42), गण्या ऊर्फ गणेश तुकाराम रायते (23, सर्वजण गणेश चौक) व सन्या ऊर्फ समीर इस्माईल पठाण (23, म्हाडा कॉम्प्लेक्स, सिव्हिल हडको) यांना अटक केली.या खटल्यात पुणे येथील सरकारी वकील एन. डी. पाटील यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. न्यायालयाने दिनेशला खून केल्याप्रकरणी 10 वष्रे, तर खुनाचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी 3 वष्रे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले.