आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल योजनेच्या ‘पीएमसी’ला मंजुरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत महापालिकेने हाती घेतलेल्या घरकुल योजनेच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समितीच्या (पीएमसी) नेमणुकीचा प्रश्न मार्गी लागला आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पीएमसी नेमणुकीला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

नूतन सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायी समितीची सभा झाली. घरकुल योजनेच्या पीएमसी नेमणुकीबरोबरच इतर विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली. शहरात उभारण्यात येणार्‍या 480 घरांच्या कामासाठी सल्लागार समिती नियुक्त करण्याची अट शासनाने घातली आहे. मध्यंतरी स्थायी समिती अस्तित्त्वात नसल्याने पीएमसी नियुक्तीचा विषय रखडला होता. महापौर शीला शिंदे यांनी हा विषय महासभेत घेतला, परंतु पीएमसी नियुक्ती अधिकार स्थायीचा असल्याने या विषयाला महासभेत विरोध झाला. सभापती निवडीनंतर स्थायीच्या पहिल्याच सभेत हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला. औरंगाबाद येथील आर्क असोसिएट्स या संस्थेने सर्वांत कमी देकार रक्कम 3. 33 टक्के व सेवाकर अशी निविदा भरली होती. या निविदेला मंजुरी मिळाली. संस्थेने शहरात व प्रकल्पाच्या ठिकाणी कार्यालय सुरू करावे, तसेच प्रकल्पाचे काम पाहण्यासाठी किती कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येणार याची माहिती द्यावी, अशा अटी स्थायीने घातल्या आहेत.
नगरोत्थान अभियानांतर्गत अमरधाम, वेताळबाबा मंदिर ते एमएसईबी सबस्टेशनपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी मागवण्यात आलेल्या निविदा मंजूर करणे, सावेडीतील भाजी मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील हॉल भाडेतत्त्वावर देणे, शहरासह जिल्ह्यातील नर्सिंग महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात प्रशिक्षणासाठी परवानगी देणे, मनपाच्या स्थावर मिळकतीच्या कामासाठी नेमलेल्या पथकास मुदतवाढ देणे, आरोग्य व पाणीपुरवठा विभागात कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या अधिकार्‍यांच्या मानधनात वाढ करणे हे विषयही सभेत मंजूर करण्यात आले.