आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारसा नगरचा: समृद्ध ऐतिहासिक वारशाबरोबर जैवविविधतेचे दर्शन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कधीकाळी तोफगोळ्यांचा वर्षाव आणि खणाखणाट करणाऱ्या तलवारींचे द्वंद्व पाहिलेला बुरूज, त्यावर ऐटीत बसलेला गरूड, पोपटांचा थवा, मोरांचा केकारव, घनदाट हिरवाई अनुभवण्याची संधी मंगळवारी इतिहासप्रेमी नगरकरांना मिळाली. 

‘जागतिक वारसा दिना’निमित्त सकाळी किल्ल्यात भ्रमंती आयोजित करण्यात आली. प्रारंभी खंदकाशेजारून किल्ल्याला प्रदक्षिणा घालत चिरेबंदी बुरुजांचं वैशिष्ट्य, त्यावरील शिल्पं, खंदकात पाणी आणण्यासाठी असलेले दगडी आणि खापरी नळ, खंंदकातील बांध, शिलालेख अशा गोष्टी पहात असतानाच निशाण बुरुजावर बसलेला गरूड दिसला. त्याने आकाशात भरारी घेताच पोपटांचा थवा तिथे आला. सोबतीला मोरांचा केकारव. खंदकाच्या पश्चिमेकडील भागात मागील महिन्यापर्यंत पाणी होतं. वाढत्या उन्हामुळं ते आटत अालं असलं, तरी राहिलेलं डबकंही पक्ष्यांसाठी पुरेसं आहे. 

खंदकातील पाणी बाहेर काढण्यासाठी केलेली व्यवस्था आणि हत्ती दरवाजा पाहिल्यानंतर किल्ल्याच्या आतील भागात भटकंती करण्यात आली. किल्ल्यात प्रवेश करताना दुतर्फा नगर परिसरातील ऐतिहासिक स्थळांची चित्रं असलेले फ्लेक्स लावण्यात आले आहेत. किल्ल्यातील नेता कक्षात स्वातंत्र्य चळवळीत तिथे स्थानबद्ध असलेल्या राष्ट्रीय नेत्यांची नव्यानं रेखाटलेली चित्रं लावण्यात आली आहेत. येत्या मेपासून किल्ला अधिकृतरित्या पर्यटकांसाठी खुला होत आहे. त्यासाठी नेता कक्ष रंगरंगोटीसह सज्ज होत आहे. 

प्रतिकृतींचे कौतुक 
नगरच्याकिल्ल्याची प्रतिकृती बालाजी वल्लाल यांनी, तर फराहबख्क्षची प्रतिकृती विलास नवगिरे यांनी तयार केली आहे. हुबेहूब साकारण्यात आलेल्या या प्रतिकृती पाहून जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी त्यांचे कौतुक केले. जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकाऱ्यांनी नवगिरे वल्लाल यांच्या घरी जाऊन या प्रतिकृतींचे अवलोकन केले. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार अनिल डेंगळे, ठाकूरदास परदेशी, पंकज मेहेर, मोहितकुमार डागा आदी उपस्थित होते. 
 
 
बातम्या आणखी आहेत...