आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

204 मिलिमीटर पावसात 2 कोटींचा कांदा !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मागील वर्षी हिवरेबाजारमध्ये फक्त 204 मिलिमीटर पाऊस पडला. त्याच्या आधीच्या वर्षी त्याहीपेक्षा कमी म्हणजे केवळ 196 मिलिमीटर पाऊस झाला होता. असे असताना उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून आम्ही 2 कोटींचे उत्पन्न केवळ कांद्यातून घेतले. नियोजन असेल, तर दुष्काळावर अशी सहज मात करता येते, असे सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी सांगितले.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या महाराष्ट्रातील युवक-युवतींच्या एका तुकडीने गुरुवारी हिवरेबाजारला भेट देऊन तेथील विकासकामांची पाहणी केली. या तरुणाईशी संवाद साधताना पोपटरावांनी हिवरेबाजारच्या यशाची सूत्रे सांगितली.

दुष्काळाचे रडगाणे गात टँकरची मागणी करणार्‍या गावांपेक्षाही कमी पाऊस हिवरेबाजारमध्ये होतो. तथापि, या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे आणि त्यानुसार पिकांचे नियोजन आम्ही करतो. मागील वर्षी पुरेसे पाणी होते, तरी भविष्यातील गरज लक्षात घेऊन अतिरिक्त उपसा टाळला. त्यामुळे या उन्हाळ्यातही गावातील सर्व 294 विहिरींत पाणी आहे, पिण्याच्या पाण्याचे बोअर सुरू आहेत. गाव हंडामुक्त झाला असून आता प्रत्येक घरात दररोज 500 लिटर पाणी नळाने मिळते, असे पोपटराव म्हणाले.

वृक्षारोपणाचे कार्यक्रम अनेक ठिकाणी होतात, पण झाडे जगवण्याकडे मात्र लक्ष दिले जात नाही. हिवरेबाजारमध्ये मात्र लावलेल्या प्रत्येक झाडाची जपवणूक केली जाते. जलसंधारण, वनीकरण, कुरणविकास यासाठी प्रामाणिक प्रयत्न गावकर्‍यांनी केले. त्यामुळे भर उन्हाळ्यात जमिनीपासून 600 फूट उंचावरच्या डोंगरावर घेतलेल्या बोअरला केवळ 40 फुटांवर पाणी लागले. हा काही चमत्कार नाही, तर हिवरेबाजारच्या गावकर्‍यांनी मागील 23 वर्षांपासून घेतलेल्या कष्टांचे फळ आहे. या पाण्यामुळे वन्यपशू-पक्ष्यांची पाण्याची सोय झाली आहे. आता या भागात मोरांचे थवे, हरणांचे कळप, शिवाय दक्षिण आफ्रिकेतून स्थलांतरित होऊन येणारे परदेशी पक्षीही दिसतात, असे ते म्हणाले.

हिवरेबाजारमध्ये शेतीसाठी बोअरवेल घेतली जात नाही. ऊस, केळी, डाळिंबासारखी जास्त पाणी लागणारी पिके घेण्यावर ग्रामसभेची बंदी आहे. केवळ कांद्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळू शकते, हे आम्ही दाखवून दिले आहे. विहिरीत पाणी येऊन उपयोगी नाही, तर ते पाणी कसे वापरायचे याची जलसाक्षरता निर्माण करणे गरजेचे आहे. त्यात आम्ही अपयशी ठरलो, तर कोट्यवधी रुपये खर्च करून केलेल्या जलसंधारणाचाही उपयोग होणार नाही, असे पोपटरावांनी सांगितले.

कर्जमाफी, अनुदान बंद करा..
कर्जमाफी, अनुदान बंद करायला हवे. अनुदान बंद केल्याशिवाय समाज आपल्या पायावर खंबीरपणे उभा राहू शकणार नाही, असे पोपटराव पवार यांनी सांगितले. इस्त्राएलमध्ये अनुदान देताना शेतकरी डोळ्यासमोर असतो, आपल्याकडे मात्र व्यापार्‍यांचे हित पाहिले जाते. त्यामुळे ठिबकचे अनुदान घेऊन अनेक शेतकरी आज कर्जाच्या बोजाखाली अडकले आहेत, असे ते म्हणाले.