आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल १९६ पोलिसांना लागली "बदल्यांची लॉटरी', सुव्यवस्थेचा विचार करून काढला आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर; पोलिसदलातील तब्बल १९६ कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्यांचा आदेश रविवारी दुपारी काढण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी हा आदेश काढला. कमी संख्याबळ कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने विचार करून या बदल्या करण्यात आल्या आहेत. गरजेनुसार काही पोलिस ठाण्यांत वाढीव पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांच्या बदल्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बहुतांश पोलिसांना मनपसंत ठाण्यात नेमणूक मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर "लॉटरी' लागल्याचा आनंद दिसला.
विनंती बदल्यांसाठी अर्ज केलेल्यांपैकी ३९ पोलिसांच्या बदल्या झाल्या आहेत. मुख्यालयात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या, विनंती अर्जानुसार, कमी संख्याबळ लक्षात घेता, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, तसेच अतिरिक्त संख्याबळ अशा वेगवेगळ्या पाच कारणांमुळे पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करून त्यांना बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे लागणार आहे. तसा अहवाल संबंधित पोलिस निरीक्षकांनी तत्काळ पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे.

तात्पुरत्या बदल्यांमुळे श्रीरामपूर शहर, शहर वाहतूक शाखा, संगमनेर शहर, स्थानिक गुन्हे शाखेचे संख्याबळ आता वाढले आहे. क्षमतेपेक्षा अधिक कर्मचारी असल्यामुळे जिल्हा विशेष शाखेतील काही पोलिसांची इतरत्र बदली झाली आहे. जिल्हा पोलिस दलात २०११ ला भरती झालेले बहुसंख्य कर्मचारी पोलिस सध्या मुख्यालयात नेमणुकीला होते. त्यांची जिल्ह्यातील विविध ठिकाणी बदली करण्यात आली आहे. कमी संख्याबळ असलेल्या पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल ६६ जणांची बदली झाली आहे.

श्रीरामपूर शहरात सर्वाधिक ९, संगमनेर ६, तर स्थानिक गुन्हे शाखेत कर्मचारी वाढले. विनंती अडचणींबाबत बदलीसाठी अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी डॉ. त्रिपाठी यांनी जाणून घेतल्या. त्यापैकी १८ पोलिसांना संलग्न नेमणुकीच्या ठिकाणीच पुन्हा तात्पुरती नेमणूक मिळाली आहे. कमी संख्याबळ असलेल्या ठिकाणी ३५ पोलिसांना नियुक्ती मिळाली, तर मंजूर संख्याबळापेक्षा अधिक असलेल्या पोलिसांची इतरत्र बदली झाली आहे.

अखेर अधिकृत झालाच
काहीहीकरून नगर शहरातच राहायचे, अशी बहुतांश पोलिसांची मानसिकता आहे. अशा पोलिसांना विनंती बदल्यांनुसार मनपसंत ठाण्यात नियुक्ती मिळाली. एका पोलिसाचे कोपरगावातील "कारनामे' डोईजड झाल्यामुळे त्याची मुख्यालयात बदली झाली होती.
अधिकाऱ्यांच्या पुढे पुढे करून संलग्न म्हणून एका स्थानिक शाखेत तो आला. अधिकाऱ्यांनी त्याला कायम करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला, पण त्याचा भूतकाळ लक्षात घेता यापूर्वीच्या अधीक्षकांनी त्याला वेळोवेळी नाकारले. या वेळी मात्र त्याचीही लॉटरी लागली अन् तो तात्पुरता का होईना, पण महत्त्वाच्या शाखेत अधिकृत झालाच...